

पुढारी ऑनलाईन डेस्क : Maharashtra Legislative Council Election | विधानपरिषदेवरील पाच रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. २७ मार्चला मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. यासाठी भाजपच्या वाट्याला तीन व शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या प्रत्येकी एक जागा आली आहे. भाजपने रविवारी या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे यांना भाजपने संधी दिली आहे.
महाराष्ट्रात विधान परिषदेच्या ५ जागांसाठी पोट निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात आला. आमशा पाडवी, राजेश विटेकर, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड हे विधान परिषद सदस्य विधानसभेवर निवडून गेल्याने त्यांच्या जागा रिक्त झाल्या होत्या. त्यांच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान, या सर्व जागा आमदारांच्या वतीने निवडल्या जाणाऱ्या आहेत.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार या उद्या १७ मार्च रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. १८ मार्चला अर्जांची छाननी प्रक्रिया होईल. २० मार्चला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे तर २७ मार्चला मतदान होईल आणि संध्याकाळी ५ वाजता निकाल लागणार आहे.