

गौरीशंकर घाळे
मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजपने तीस दिवसांचा कार्यक्रम नक्की केला आहे. त्यासाठी मुंबईतील प्रत्येक नेत्यावर एक निश्चित जबाबदारी सोपविली जाणार आहे. या तीस दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत येत्या दोन दिवसांत वॉर रूम सुरू करण्यात येणार असून छोट्या साखळी सभांनंतर जानेवारी महिन्यात मोठ्या सभांचा धडाका सुरू केला जाणार आहे.
मुंबई महापालिका निवडणुकांच्या तयारीसाठी बुधवारी पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्यांची बैठक पक्षाच्या दादर येथील वसंतस्मृती कार्यालयात पार पडली. या बैठकीस मुंबई भाजपचे अध्यक्ष अमीत साटम, मंत्री आशीष शेलार, मंगलप्रभात लोढा, प्रवीण दरेकर, गणेश खनकर, आचार्य पवन त्रिपाठी यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. या बैठकीत आगामी निवडणुकांसंदर्भातील सर्व कार्यक्रम आणि पक्षाच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यासंदर्भात बोलताना अमित साटम म्हणाले की, मुंबई महापालिका निवडणुकांसाठी पक्षाने 30 दिवसांचा कार्यक्रम निश्चित केला आहे. येत्या दोन दिवसांत निवडणुकांसाठी पक्षाचे वॉर रूम सुरू केले जाईल. तर, निवडणूक जाहीरनाम्यासाठी पक्षाने नागरिकांकडून सूचना आणि मते मागविली होती. पक्षाचा जाहीरनामा बनविताना या सूचनांचा आणि मतांचा विचार केला जाणार आहे. त्यानंतरच जाहीरनामा अंतिम केला जाणार आहे.
मुंबईतील जागावाटपाचे चित्र अद्याप अस्पष्ट असले तरी भाजपने आपल्या पातळीवर तयारीला सुरूवात केली आहे. पक्षाचे मुंबई अध्यक्ष साटम आणि त्यांची टीम निवडणुकांच्या कामाला लागली आहे. निवडणुकांच्या 30 दिवसांच्या कार्यक्रमासाठी पक्षाच्या मुंबईतील जवळपास सर्व नेत्यांवर वेगवेगळी जबाबदारी देण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रमाचे व्यवस्थापन आणि त्यातील कामांचे निश्चित वाटप केल्याने सर्वांची जबाबदारी निश्चित होणार असल्याचे पक्षातील नेत्यांनी स्पष्ट केले.
आधी छोट्या, त्यानंतर मोठ्या सभांची आखणी
महायुतीचे जागावाटप अद्याप बाकी आहे. त्यातच बंडखोरीचा धोका टाळण्यासाठी शेवटपर्यंत वाटाघाटी चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरूवातीच्या टप्प्यात छोट्या सभांवर भर दिला जाणार आहे. त्यानंतर जानेवारी महिन्यात मोठ्या जाहीर सभा घेण्याचे पक्षाचे नियोजन आहे.