राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई गँगने स्वीकारली आहे. या टोळीचे भारतासह जगातील कुख्यात गँगस्टर्ससोबत संधान आहे. सोशल मीडियासह डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून लॉरेन्स याने तुरुंगातूनच देशात दहशत निर्माण केली आहे. या गँगच्या तुरुंगातील कार्यपद्धतीविषयी थोडक्यात जाणून घेऊ...
12 सप्टेंबर रोजी दिल्लीतील एका व्यायामशाळेच्या (जिम) मालकाची या बिष्णोई गँगने तुरुंगातूनच हत्या घडवून आणली होती. लॉरेन्स सध्या गुजरातमधील साबरमती मध्यवर्ती कारागृहात आहे.
लॉरेन्सची कौटुंबिक पार्श्वभूमीवर चांगली आहे. 31 वर्षीय लॉरेन्स हा मूळचा पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील धत्रनवली गावातील रहिवासी आहे. पंजाब, हरियाणा आणि राजस्थानात हा बिष्णोई समाज मोठ्या प्रमाणात आहे. लॉरेन्स या समुदायातील आहे.
महाविद्यालयीन शिक्षणानंतर तो पंजाब विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष होता. लॉरेन्स याच्यावर राजकीय नेत्यांच्या खुनासह 12 हून अधिक गंभीर गुन्हे नोंद आहेत. मद्य, शस्त्र आणि अमली पदार्थाच्या तस्करीमध्ये त्याची गँग सक्रिय आहे.
2010 साली त्याच्या खुनाच्या प्रयत्नाचा पहिला गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर खंडणीसह अन्य गंभीर गुन्ह्यातही त्याचा सहभाग आहे. त्याच्यावर बेकायदा प्रतिबंधक कृत्य आणि मोकाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
या गँगचे देशात 700 आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 300 शूटर्स स्लीपर सेल म्हणून कार्यरत आहेत. कॅनडात आश्रय देण्याच्या आमिषातून ही गँग तरुणांना त्यांच्या टोळीत भरती करीत आहे. यासाठी या गँगकडून सोशल मीडियाचा वापर केला जातो.
कुख्यात गँगस्टर गोल्डी ब्रार याचा तो खास मित्र आहे. लॉरेन्स याचा भाऊ अनमोल याच्यावर पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येत सहभाग असल्याचा आरोप आहे.
व्हीओआयपी, डब्बा कॉलिंगसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून टोळीतील सदस्य आणि अन्य गँगच्या संपर्कात राहतो. तपास यंत्रणांच्या निदर्शनास येणार नसलेल्या मोबाईल फोन्सचा वापर करतो.
लॉरेन्स हा मूळचा सधन कुटुंबातील आहे. तो तुरुंगात असूनही त्याच्या घरातील लोक लॉरेन्सच्या महागड्या कपड्यांची आणि जोड्यांची हौस पुरवत आहेत. लॉरेन्स तुरुंगातील राहणीमानावर वर्षाला 40 लाख रुपये खर्च करीत असल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली.