

मुंबई: शनिवारी रात्री भुलेश्वर राजा गणपती आगमनाच्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्यानंतर बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने दुखवटा जाहीर केला असून, आगामी आगमन मिरवणुकीत वाजंत्री आणि इतर कोणत्याही प्रकारचा जल्लोष करू नये, असे आवाहन केले आहे.
आगमन आणि विसर्जन साेहळ्यात अशा घटना टाळण्यासाठी मंडळांमधील सुरक्षा व्यवस्था आणि इतर उपाययोजनांसंदर्भात समन्वय समितीची तातडीने बैठक घेण्यात येणार असल्याचे समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले.
भुलेश्वर राजा मंडळातील मृत व्यक्तींच्या वारसांना तसेच जखमींना शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी समितीने केली असून, शासनाशी या संदर्भात लेखी पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे ॲड. दहिबावकर यांनी सांगितले.