Bishnoi gang : भोजपुरी स्टारसह मॅनेजरला बिष्णोई टोळीकडून धमकी
मुंबई : भोजपुरी स्टार पवन सिंग व त्यांच्या मॅनेजरला जिवे मारण्याची धमकी बिष्णोई टोळीकडून आली आहे. या धमकीनंतर पवन सिंगच्या मॅनेजरने ओशिवरा पोलिसांत तक्रार दिली असून, या तक्रारीची शहानिशा सुरू आहे.
बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याला यापूर्वी बिष्णोई टोळीकडून अनेकदा जिवे मारण्याची धमकी आली. या धमकीचे सत्र सुरू असताना राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि मंत्री बाबा सिद्दीकी यांची बिष्णोई टोळीकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या दोन्ही घटना ताज्या असताना आता भोजपुरी अभिनेता पवन सिंग व त्यांच्या मॅनेजरला बिष्णोई टोळीकडून जिवे मारण्याची धमकी आली आहे. 6 डिसेंबरला रात्री दहा वाजता एका अज्ञात व्यक्तीने त्यास कॉल करून ही धमकी दिली. त्यानंतर व्हॉट्सॲपवर धमकीचे मॅसेज येऊ लागले.
पवन सिंग, सलमानसोबत कुठेही एकत्र काम करू नये, अन्यथा तुझा सिद्धू मुसेवाला होईल अशी धमकीच या अज्ञात व्यक्तीने दिली. सुरुवातीला त्यांना एकाच मोबाईलवरून धमकीचे मेसेज आणि कॉल येत होते. नंतर वेगवेगळ्या मोबाईलवरून धमकी येत राहिली. दुसऱ्या दिवशी अन्य एका व्यक्तीने त्याला कॉल करून तू आमच्याविषयी खोटी माहिती पसरवत आहे. तुझ्याकडे पैशांची मागणी केली नाही, फक्त सलमानसोबत काम करू नकोस इतकेच सांगितले होते. तू सलमानसोबत काम केल्यास त्याचे तुला गंभीर परिणाम भोगावे लागतील अशीही त्याने धमकी दिली. पवनच्या जिवाला धोका असून, त्याला काही दुखापत झाल्यास त्यास तूच जबाबदार राहशील, असेही या व्यक्तीने त्याच्या मॅनेजरला सांगितले. सततच्या धमक्यांना कंटाळून मॅनेजरने सोमवारी ओशिवरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज दिला.

