

नवी दिल्ली : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बुधवारी ताब्यात घेतले. अमेरिकेने त्याला हद्दपार केल्यानंतर अटक केल्याचे एनआयएने जारी केलेल्या निवेदनात म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकीच्या हत्या प्रकरण, सलमान खानच्या निवासस्थानी झालेल्या गोळीबाराचे प्रकरण आणि पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्या प्रकरणात अनमोलचे नाव आलेले आहे. त्याला लवकरच दिल्लीतील एनआयए विशेष न्यायालयात हजर केले जाईल.
एनआयएने निवेदनात माहिती दिली की, अनमोल बिश्नोई हा त्याचा भाऊ लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीत सहभागी असल्याबद्दल अटक करण्यात आलेला १९ वा आरोपी आहे. तो २०२२ पासून फरार होता. मार्च २०२३ मध्ये एनआयएने त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. २०२०-२०२३ या कालावधीत देशात विविध दहशतवादी कृत्यांमध्ये गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोईला सक्रियपणे मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर त्याच्याविरोधात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
अनमोल लॉरेन्स बिश्नोई टोळीसाठी अमेरिकेतून दहशतवादी कारवाया करत राहिला. अनमोलने टोळीच्या शूटर्स आणि इतरांना आश्रय आणि लॉजिस्टिक सपोर्ट पुरवला होता. तो इतर गुंडांच्या मदतीने परदेशातून भारतात खंडणी वसूल करण्यातही गुंतला होता, असे एनआयएने निवेदनात म्हटले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, अनमोल बिश्नोईच्या डोक्यावर एनआयएने १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. अनमोल बिश्नोई देशातील बेकायदेशीर कारवायांमध्ये सहभागी असलेल्या व्यापक नेटवर्कबद्दल महत्त्वपूर्ण माहिती देऊ शकतो, असे एनआयएने म्हटले आहे.