

मुंबई : मध्य रेल्वेच्या अप मार्गावरील भांडुप स्थानकाजवळ गुरुवारी सकाळी सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला. त्याचा फटका लोकल सेवेला बसला. ऐन कार्यालयीन वेळेत बिघाड झाल्याने नोकरदारांचे प्रचंड हाल झाले. लोकल उशिरा धावत असल्याने नोकरदारांना कार्यालयात पोहचायला उशीर झाला. ४८ मिनिटांनी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर सकाळी ८.३५ वाजता लोकल सेवा पूर्ववत करण्यात झाली.
नाहूर आणि भांडुप स्थानकांदरम्यान अचानक सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. सिग्नल लाल झाल्यामुळे पाठोपाठ येणाऱ्या लोकल गाड्या रुळांवरच थांबवाव्या लागल्या. या बिघाडाचा परिणाम लोकलच्या वेळापत्रकावर झाला. मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या गाड्या पाऊण तास रखडल्या. त्यामुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, कुर्ला, दिवा, दादर आदी रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी दिसून येत होती.
काही दिवसांपासून मध्य रेल्वे मार्गावर विविध तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. अशात भांडुप स्थानकातील सीएसएमटीच्या दिशेचा सिग्नल गुरुवारी सकाळी हा बिघाड झाल्यानंतर मुंबईकडील लोकल गाड्या ए - मार्करच्या आधारे पुढे सोडण्यात येत होत्या. त्याने वेळापत्रक कोलमडले. या गोंधळात तीन लोकल गाड्यांचे वेळापत्रक विस्कटले होते.
लोकल ठप्प झाल्याने कांजूरमार्ग आणि विक्रोळी परिसरातून पवईच्या दिशेने जाणारे प्रवासी लोकलमध्येच अडकून पडले होते. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी बिघाड दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर ४८ मिनिटांनंतर सिग्नल पूर्ववत करण्यात आला. मात्र बिघाड कधीपर्यंत दुरुस्त करण्यात येईल, याची माहिती मध्य रेल्वेकडून दिली नसल्याने लोकलची वाट पाहत बसलेल्या प्रवाशांचे हाल झाल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली.
फक्त तीन लोकलचे वेळापत्रक बदलले
भांडुप जवळील सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे सर्व लोकल ए - मार्करच्या आधारे सोडल्या जात होत्या. फक्त तीन लोकलचे वेळापत्रक बदलले गेले. मात्र त्यामुळे कोठेही लोकल वाहतूक खोळंबून राहिली नाही, असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.