

मुंबई: बेस्ट परिवहन विभागात जवळपास आठ वर्षांनंतर थेट भरती मोहिम राबविली जात आहे. या अंतर्गत ३६४ वाहकांची भरती सुरू झाली आहे. वाहक पदासाठी २९ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. कंत्राटी कामगारांनी प्राधान्य दिले जाणार आहे.
काटकसरीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून उपक्रमाने २०१९ पासून नवीन भरती केली नाही. त्यामुळे अनुभवी कर्मचारी-अधिकारी निवृत्त होत असल्याने मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. त्याचा मोठा फटका बेस्ट बस सेवा आणि वीज पुरवठा सेवेला बसत आहे.
त्यामुळे या भरती मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात उपक्रमाच्या १,०३६ रिक्त वाहक पदांपैकी सुमारे ३५ टक्के पदे भरली जाणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना २२ हजार ५०० रुपये मूळ वेतनासह भत्ते आणि इतर लाभ दिले जाणार आहेत.
या पहिल्या थेट भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज १ ऑगस्टपासून सुरू झाले आहेत. बेस्टने ३६४ वाहकांची पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी २९ ऑगस्टपर्यंत अर्ज खुले राहणार आहेत.
बेस्टकडे सध्या ७ हजार ४३८ वाहकांची मंजूर पदे आहेत. परंतु ६ हजार ४०२ वाहक सेवेत असल्याने १ हजार ०३६ वाहकांची कमतरता आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मराठी आणि इंग्रजी हे अनिवार्य विषय घेऊन इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी १८ ते ४३ वर्षे आहे. किमान १६४ सेंमी उंची आणि ४५ किलो वजनाचा समावेश आहे.