Belgaum Investment Scam: बेळगावच्या गुंतवणूक घोटाळ्यात १० हजार गुंतवणूकदार महाराष्ट्राचे; ईडीकडून ४२७ कोटींची मालमत्ता जप्त

३ टक्‍के परताव्‍याचे अमीष दाखवत ३५ हजारांहून अधिक गुंतवणूकदारांना गंडा
Belgaum Investment Scam
Belgaum Investment ScamPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: कर्नाटकातील बेळगाव येथील शिवम असोसिएट्स या संस्थेच्या माध्यमातून चालविण्यात आलेल्या तब्बल २,४५९ कोटी रुपयांच्या कथित गुंतवणूक घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे.

संस्थेचा प्रमुख शिवानंद सिद्धाप्पा नीलन्नावर आणि त्याच्याशी संबंधित व्यक्ती व संस्थांच्या ४२७ कोटी रुपयांच्या मालमत्तांवर ईडीने तात्पुरती जप्ती आणली आहे. या प्रकरणात ३५ हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.

विशेष म्हणजे, या घोटाळ्याचे महाराष्ट्र कनेक्शनही गंभीर आहे. कर्नाटक गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) जून २०२६ मध्ये दिलेल्या माहितीनुसार, तपासलेल्या २० हजार गुंतवणूकदारांपैकी तब्बल १० हजार गुंतवणूकदार महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे बेळगावमधील या आर्थिक घोटाळ्याची व्याप्ती महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.

ईडीच्या मंगळुरू उपविभागीय कार्यालयाने ३० ऑक्टोबर रोजी आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) ही कारवाई केली. जप्त मालमत्तांमध्ये सुमारे ३६७ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी, ४७ बँक खात्यांमधील ४४ कोटी रुपयांची शिल्लक, १३ कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्ता आणि १.३१ कोटी रुपयांच्या शेअर बाजारातील गुंतवणुकीचा समावेश आहे.

Belgaum Investment Scam
Maharashtra FDA Action: महाराष्ट्रात FDA ची मोठी कारवाई; २८ हजार क्विंटल खाद्यतेल आणि २० हजार क्विंटल मसाला जप्त

तीन टक्के मासिक परताव्याचे आमिष

शिवानंद नीलन्नावर याने शिवम असोसिएट्स आणि संबंधित संस्थांच्या माध्यमातून गुंतवणूक योजना चालविल्याचा ईडीचा आरोप आहे. गुंतवणूकदारांना दरमहा तीन टक्के निश्चित परतावा आणि नवीन गुंतवणूकदार जोडल्यास अतिरिक्त ०.५ टक्के कमिशन देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. या माध्यमातून ३५ हजारांहून अधिक लोकांकडून सुमारे २,४५९.४९ कोटी रुपये जमा करण्यात आले.

सुरुवातीला नवीन गुंतवणूकदारांकडून जमा होणाऱ्या पैशांतून जुन्या गुंतवणूकदारांना परतावा दिला जात होता. त्यामुळे योजनेवर विश्वास निर्माण झाला आणि अधिकाधिक लोकांनी गुंतवणूक केली. मात्र, जमा होणाऱ्या रकमेपेक्षा परताव्याची रक्कम वाढू लागल्यानंतर पैसे देणे बंद करण्यात आले. सुमारे २,१२५.६० कोटी रुपयांची मूळ गुंतवणूक अद्याप परत करण्यात आलेली नसल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे.

Belgaum Investment Scam
MBBS BDS Admission 2026: MBBS-BDS प्रवेश हुकला? विद्यार्थ्यांना पुन्हा संधी; नोंदणीसाठी आज शेवटची मुदत

शेअर बाजारात १८५ कोटींचे नुकसान

गुंतवणूकदारांकडून जमा झालेल्या पैशांचा मोठा हिस्सा उच्च जोखमीच्या शेअर बाजारातील व्यवहारांमध्ये गुंतविण्यात आला. या व्यवहारांमध्ये सुमारे १८५.९५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले.

याशिवाय सुमारे २५ कोटी रुपये श्रीमाता को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आणि धनश्री मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीमार्फत फिरविण्यात आल्याचे तपासात आढळले. या पैशांच्या मुदत ठेवी करून त्यावर कर्ज घेण्यात आले. त्यानंतर संबंधितांच्या नावावर जमिनी खरेदी करण्यात आल्याचा ईडीचा आरोप आहे.

पत्नी आणि अल्पवयीन मुलाच्या खात्यांत पैसे

गुंतवणूकदारांकडून जमा केलेली रक्कम मुख्य आरोपीच्या पत्नी संगीता आणि अल्पवयीन मुलगा सिद्धांत यांच्या बँक खात्यांमध्ये वळविण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. शिवम सेवा (ओपीसी) प्रायव्हेट लिमिटेड, शिवम लाइफलाइन प्रायव्हेट लिमिटेड आणि शिवम फूड्स या व्यावसायिक संस्थांचाही कथित गैरव्यवहारात वापर करण्यात आला. यापैकी शिवम सेवा या कंपनीत सुमारे १९ कोटी रुपये वळविण्यात आल्याचा ईडीचा दावा आहे.

या घोटाळ्यात महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांची संख्या लक्षणीय आहे. कर्नाटक सीआयडीचे डीआयजी भीमाशंकर गुलेड यांनी जूनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, त्यावेळी २० हजार गुंतवणूकदारांच्या नोंदींची पडताळणी करण्यात आली होती. त्यापैकी १० हजार गुंतवणूकदार महाराष्ट्रातील होते. महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांची मोठी संख्या लक्षात घेऊन कर्नाटक सीआयडी महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने तपास करत होती.

मुख्य आरोपीचा आणखी एक व्यावसायिक भागीदार महाराष्ट्रात असल्याची माहितीही तपासात समोर आली होती. त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू होते. याशिवाय आरोपीने खरेदी केलेल्या ११ आलिशान मोटारी महाराष्ट्रात नोंदणीकृत असल्याचेही तपासात आढळले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांचे पैसे, संशयित भागीदार आणि आर्थिक व्यवहारांची साखळी यांचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.