

मुंबई : मुंबई सेंट्रल आणि ताडदेव परिसराला जोडणार्या ब्रिटिशकालीन बेलासिस पूल धोकादायक असल्याचे घोषित करून काही महिन्यांपूर्वी जमीनदोस्त करण्यात आला. त्या जागी नव्याने पुलाचे बांधकाम सुरू झाले असून आत्तापर्यंत 45 टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. परंतु या पुलाच्या बांधकामात आड न येणारी आणि एका बाजूला मोठ्या प्रमाणात असणारी झाडे मुळासकट तोडण्याचे काम कंत्राटदाराने सुरू केले आहे. स्थानिकांनी वृक्षतोडीविरोधात आक्षेप घेतल्यानंतरही कंत्राटदाराकडन मनमानी कारभार सुरू असून राजरोसपणे जुन्या झाडांची कत्तल केली जात आहे.
स्थानिकांनी परवानगी विचारली असता कंत्राटदार दाखवू शकला नाही. परंतु तत्पूर्वी कंत्राटदार अनेक झाडांची कत्तल करून मोकळा झाला होता. झाडे तोडून पर्यावरणाची मोठी हानी होत असल्याने महापालिकेने यापुढे काम देताना दहा वेळा विचार केला पाहिजे. परप्रांतीय ठेकेदार फक्त पैसे कमावण्यासाठी आले आहेत. यापेक्षा स्थानिकांना काम देऊन रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. महापालिका कंत्राटदार अनेकदा झाडे तोडताना दिसतात. पण झाडे लावताना मात्र कंत्राटदारांना कधी पाहिले नाही, असा आरोपही नागरिकांनी केला आहे.
मुंबई शहर झाडांच्या संख्येत मोठी घट अनुभवत आहे. दरवर्षी पावसाळ्यात आपल्याला हवामानाचे असंतुलन, उष्णता वाढ आणि पूर परिस्थिती याचा फटका बसतो. अशावेळी सरकारने आणि स्थानिक प्रशासनाने विकास व पर्यावरण यामध्ये समतोल राखणे अत्यावश्यक आहे.
शेवटी प्रश्न असा आहे की प्रगतीच्या नावाखाली जर निसर्गाचाच नाश होत असेल, तर ही प्रगती आपल्याला किती काळपर्यंत टिकवता येईल? असा प्रश्न ताडदेवकरांनी उपस्थित केला आहे. ताडदेव येथील बेलासिस पुलाचे नूतनीकरण हे निश्चितच वाहतुकीसाठी महत्त्वाचे आहे, याबाबत कोणताही विरोध नाही. परंतु या विकासकामांच्या आड निसर्गाचा विशेषतः अनेक वर्षे जुन्या वृक्षांचा बळी जाणे ही खरोखरच गंभीर बाब आहे.
सदर पुलाच्या रुंदीकरण कामादरम्यान जवळपास पाच ते सहा मोठी वड व पिंपळाची झाडे पूर्णपणे तोडण्यात आली. स्थानिक नागरिक म्हणून संबंधित ठेकेदाराला विचारणा केली, तेव्हा सुरुवातीला त्यांनी सर्व झाडे तोडण्याची संमती असल्याचे सांगितले. मात्र जेव्हा संमतीपत्र मागितले गेले तेव्हा उत्तरे बदलली जाऊ लागली. कोणालातरी फोन करून नंतर सांगण्यात आले की फक्त एकच झाड आडवे येत होते म्हणून कापण्यात आले. मात्र दुसर्याच दिवशी मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल झाली.
ही झाडे सामान्य नव्हती अनेक वर्षांची वयोमर्यादा गाठलेली, पक्ष्यांचे निवासस्थान बनलेली आणि शहराच्या प्रदूषण विरोधातील लढाईत मोलाची भूमिका बजावणारी झाडे होती. वड व पिंपळासारखी झाडे केवळ छाया देत नाहीत, तर आपल्याला प्राणवायूचा अखंड स्रोत देतात. अशा झाडांची विनासंमती कत्तल ही कायद्याने आणि नैतिकदृष्ट्याही चुकीची बाब आहे.
शितल घाणेकर. महिला उपविभाग अध्यक्ष, मलबार हिल विधानसभा.
झाडे तोडण्यासाठी कायदेशीर संमती घेण्यात आली होती का?
घेतली असल्यास ती संमती सामान्य नागरिकांना दाखविण्यात का आली नाही?
संमती असेलच, तर त्यात कोणती झाडे, किती झाडे आणि कोणत्या कारणाने तोडली, असा स्पष्ट उल्लेख होता का?
झाडांची पुनर्लागवड किंवा पर्यायी व्यवस्था करण्यात येणार आहे का?