

मुंबई : गेटवे ऑफ इंडियाजवळील समुद्रात मोठ्या प्रमाणात तरंगणारा कचरा साफ करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने मानवविरहित बोटीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येथील समुद्रकिनारा स्वच्छ होणार असून परिसराच्या सौंदर्यातही वाढ होणार आहे.
गेटवे ऑफ इंडिया आणि बधवार पार्क ही दक्षिण मुंबईतील दोन महत्त्वाची ठिकाणे असून, येथे देशी-विदेशी लाखो पर्यटकांसह स्थानिक नागरिक व मुंबईकर मोठ्या संख्येने भेट देतात. त्यामुळे पर्यटकांकडून टाकण्यात येणार्या प्लास्टिक पिशव्या व अन्य कागद व पाण्यात तयार होणारी शेवाळ व अन्य तरंगणारा कचरा वाढत आहे.
त्यामुळे समुद्र व समुद्र परिसराच्या सौंदर्यात बाधा येत आहे. एवढेच नाही तर समुद्रीय पर्यावरणालाही धोका निर्माण झाला आहे. याबाबतच्या अनेक तक्रारी मुंबई महानगरपालिकेकडे आल्या होत्या. याची दखल घेत महापालिकेने गेटवे ऑफ इंडिया व बुधवार पार्क येथील समुद्रातील तरंगणारा कचरा काढण्याचा निर्णय घेतला आहे. हा कचरा दैनंदिन स्वरूपात काढला जाणार आहे. समुद्रात तरंगणारा कचरा मानवाद्वारे काढणे शक्य नसल्यामुळे कचरा संकलनासाठी मानवविरहित विद्युत बोटीसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या घनकचरा विभागाकडून सांगण्यात आले.
दोन्ही ठिकाणच्या समुद्रातील तरंगणारा कचरा काढण्यासाठी पहिल्या टप्प्यात मानवविरहित दोन विद्युत बोटींचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. या कामासाठी 66 लाख 88 हजार रुपये कंत्राटदाराला देण्यात येणार असून कंत्राटदार 720 पाळ्यांमध्ये हा कचरा साफ करणार आहे. येत्या महिन्याभरात संपूर्ण कंत्राट प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत गेटवे ऑफ इंडिया व बुधवार पार्क समुद्र पर्यटकांना कायमस्वरूपी चकाचक दिसणार असल्याचा दावा, पालिकेने केला आहे.
मुंबई शहर व उपनगरांतील अन्य समुद्रातील तरंगणारा कचरा काढण्यासाठी याच पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र टप्प्याटप्प्याने निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे केवळ चौपाटीच नाही, तर समुद्रही चकाचक होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे.