

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणारी बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम (अतिरिक्त सीईटी) २०२४ ही सामाईक प्रवेश परीक्षा महाराष्ट्र राज्यात व इतर राज्यातील परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. याबाबबत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुकांनी २९ जून २०२४ ते ३ जुलै २०२४ या कालावधीत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज दाखल करावे लागणार आहेत.
अतिरित्क परीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी २९ मे २०२४ रोजी परीक्षा दिलेली आहे. अशा इच्छुक उमेदवारांना देखील अतिरिक्त परीक्षेची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच ज्या उमेदवारांनी २९ मे २०२४ रोजीची परीक्षा दिल्यानंतर अतिरिक्त परीक्षेची संधी स्वीकारली आहे. अशा उमेदवारांचे दोन्ही परीक्षांपैकी सर्वात्तम असणारे पसेंटाईल प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत.
यासाठी प्रवेश प्रक्रियेवेळी उमेदवारांनी सर्वोतम पसेंटाईलची गुणपत्रिका संगणकीय प्रणालीवर अपलोड करणे आवश्यक राहील. अतिरिक्त परीक्षेची निकाल प्रक्रिया देखील पसेंटाईल पद्धतीने करण्यात येईल. सामाईक प्रवेश परीक्षेची तारीख निर्धारित वेळेत जाहीर केली जाणार असून याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे पत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे काढण्यात आले आहे. https://cetcell.mahacet.org/ या संकेतस्थळाला नियमितपणे भेट द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.