

मुंबई : वांद्रे रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडील पादचारी पुलाला झोपड्यांचा पुन्हा विळखा पडला आहे. पुलाला खेटून या झोपड्या उभ्या असून रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
झोपड्यांची उंची 30 ते 35 फूट असल्याने त्याचे दरवाजे व खिडक्या पादचारी पुलाकडे उघडण्यात येतात. त्यामुळे झोपड्यांतून रहिवाशी थेट पादचारी पुलावर ये-जा करती आहेत. एवढा गंभीर प्रकार असताना रेल्वे प्रशासनासह मुंबई महानगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
काही झोपड्या पाणीपुरवठा करणार्या जलवाहिन्यांवर वसल्या आहेत. काही वर्षांपूर्वी येथे लागलेल्या आगीत पादचारी पूल व स्कायवॉकही जळाला होता. पादचारी पूल नव्याने उभारावा लागला होता.
राजकीय वरदहस्त
वांद्रे रेल्वे स्टेशन लगतच्या झोपड्यांना राजकीय वरदस्त असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकार्यांकडून सांगण्यात येत आहे. महापालिकेने कारवाईचा निर्णय घेतल्यास राजकीय पक्षांकडून अप्रत्यक्षरीत्या हरकत घेण्यात येते. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकावर दबाव टाकला जातो.
आग लागल्यास धोका
वांद्रे पूर्वेला दाटीवाटीने झोपड्या उभ्या राहिल्या असून ही संख्या सुमारे 250 ते 300 इतकी आहे. त्यामुळे झोपडपट्टीमध्ये आगीची पुनरावृत्ती झाल्यास रेल्वे स्टेशनसह जलवाहिन्यांना मोठा धोका पोहचू शकतो. विशेषत: याचा त्रास हजारो रेल्वे प्रवाशांना सहन करावा लागेल, अशी भीती आहे.