

पुढारी ऑनलाईन डेस्क : बजाज ऑटोचे संचालक मधुर बजाज (वय ६३) यांचे आज (दि.११) पहाटे निधन झाले. काही दिवसांपूर्वी पक्षाघात झाल्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी पहाटे ५ च्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. २४ जानेवारी २०२४ रोजी त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. (Madhur Bajaj Death)
मधुर बजाज यांनी ३५ हजार कोटींपेक्षा जास्त किमतींची मालमत्ता मागे सोडली आहे. फोर्ब्सच्या मते, त्यांची एकूण संपत्ती सुमारे $४.१ अब्ज असल्याचा अंदाज आहे. ते बजाज ग्रुपमध्ये भागीदारी असलेल्या बजाज कुटुंबातील सदस्यांपैकी एक आहेत.
फोर्ब्सच्या फेब्रुवारी २०२१ च्या अब्जाधीशांच्या यादीत मधुर बजाज ४२१ व्या क्रमांकावर होते. ३१ मार्च २०२५ पर्यंत, त्यांच्याकडे अनेक कंपन्यांचे शेअर्स आहेत, ज्यांचे मूल्य २,९१४.४ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. याशिवाय त्यांच्या कुटुंबाकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. मधुर बजाजसह बजाज कुटुंब फोर्ब्स इंडियाच्या २०२४ च्या १०० श्रीमंत व्यक्तींच्या यादीत १० व्या क्रमांकावर होते, ज्यांची एकूण संपत्ती $२३.४ अब्ज होती. बजाज ग्रुप ही देशातील आघाडीची ऑटो कंपनी आहे.