बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ खुला, गुंतवणूक करावी की नको?

Bajaj Housing Finance IPO | 3560 कोटींचे नवे शेअर्स जारी होणार
Economic Analysis
अर्थवार्ताfile photo
Published on
Updated on

गतसप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकामध्ये अनुक्रमे एकूण 383.75 अंक व 1181.84 अंकांची घसरण होऊन दोन्ही निर्देशांक अनुक्रमे 24852.15 अंक तसेच 81183.93 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये 1.52 टक्के तसेच सेन्सेक्समध्ये 1.43 टक्क्यांची सप्ताहभरात पडझड नोंदवली गेली. या आधीच्या तीन सप्ताहांमध्ये दोन्ही निर्देशांकांनी सलग वाढ दर्शवून आजपर्यंतची सर्वोच्च विक्रमी पातळी गाठली होती; परंतु या सप्ताहात गुंतवणूकदारांनी नफा नोंदवण्यास (प्रॉपर्टी बुकिंग) प्राधान्य दिल्याने दोन्ही निर्देशांक खाली आले. सर्वाधिक घट होणार्‍या समभागांमध्ये कोल इंडिया (-6.9 टक्के), ओएनजीसी (-6.6 टक्के), टाटा मोटर्स (-5.6 टक्के), डॉ. रेड्डीज लॅब (-5.2 टक्के), एनटीपीसी (-5.1 टक्के) या कंपन्यांचा समावेश झाला, तर सर्वाधिक वाढ होणार्‍या कंपन्यांमध्ये हिरो मोटोकॉर्प (5.3 टक्के), एशियन पेंटस् (4.7 टक्के), बजाज फिनसर्व्ह (4.2 टक्के), टायटन कंपनी (3.7 टक्के), एसबीआय लाईफ इन्शुरन्स (2.5 टक्के) यांचा समावेश झाला. अमेरिकेत या सप्ताहात रोजगार निर्देशांक जाहीर झाला. यामध्ये रोजगार निर्देशांकामध्ये अपेक्षेपेक्षा कमी वाढ झाली. यामुळे फेडरल बँकेचे लवकरच अर्धा टक्का व्याजदर कपात करण्याचे उद्दिष्ट काहीसे धूसर बनले. अमेरिकेतील मध्यवर्ती फेडरल बँक लवकरात लवकर व्याजदर कपातीचे सत्र सुरू करून उद्योगधंद्यांसाठी कमी दरात पत पुरवठा सुरू होईल अशी सर्वांची अपेक्षा आहे. अर्थव्यवस्था वाढीसाठी कमी व्याजदर पोषक असतात; परंतु यामुळे महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता असते. म्हणून महागाई नियंत्रणात राखून व्याजदर कपात करणे अशी सर्व मध्यवर्ती बँकांची कसरत असते. सध्या तरी मोठी व्याजदर कपात होणे कठीण असल्याने जगभरातील भांडवलबाजारांनी आपटी खाल्ली आहे.

फ्रान्सची तेल उत्पादक कंपनी अदानी ग्रीनमध्ये गुंतवण्यास उत्सुक

फ्रान्सची तेल उत्पादक कंपनी टोटल एनर्जीज 444 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 3500 कोटी रुपये) अदानी ग्रीनमध्ये गुंतवण्यास उत्सुक. पर्यावरणपूरक अपारंपारिक (Renewable Green Energy) ऊर्जानिर्मितीसाठी ऊर्जाप्रकल्प उभारण्याचे या कंपनीचे उद्दिष्ट आहे. फ्रेंच कंपनी टोटल एनर्जीजचा आपल्या उपकंपन्यांसह अदानी ग्रीनमध्ये 20 टक्के हिस्सा आहे. अदानी ग्रीन, अदानी रिन्युएबल एनर्जी आणि टोटल एनर्जीज या तिन्ही एकत्र येऊन तयार होणार्‍या नवीन कंपनीत अदानी समूह आणि फ्रान्सचा टोटल एनर्जीज समूह यांची प्रत्येकी 50-50 टक्के भागीदारी असेल. एकूण 1150 मेगावॅट ऊर्जानिर्मितीचे प्राथमिक उद्दिष्ट असणार आहे.

वेदांताचा 7821 कोटींचा लाभांश जाहीर

खाणकाम उद्योगातील प्रमुख कंपनी वेदांताने एकूण 7821 कोटींचा लाभांश जाहीर केला. वेदांता कंपनीवर वाढलेला कर्जभार कमी करण्यासाठी हा निधी वापरला जाणार. हा अंतरिम लाभांश जाहीर झाल्याने एकूण या कंपनीने 13470 कोटी लाभांश केल्याचे समजते. मागील दोन आर्थिक वर्षांत कंपनीने विविध मार्गांद्वारे स्वतःवरील सुमारे 4.5 अब्ज डॉलर्सचे (सुमारे 36 हजार कोटी) कर्ज कमी केले आहे. तसेच पुढील दोन वर्षांत आणखी 3 अब्ज डॉलर्स (सुमारे 25 हजार कोटी) रुपयांनी कर्जभार कमी करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

केंद्र सरकारकडून जनरल इन्शुरन्समधील हिस्सा विक्री

केंद्र सरकारने जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनमधील आपला 6.78 टक्के हिस्सा विक्री केला. हिस्सा विक्रीद्वारे केंद्र सरकारने 4700 कोटींचा निधी उभा केला.

Bajaj Housing Finance चा 6560 कोटींचा IPO

बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्हची उपकंपनी बजाज हाऊसिंग फायनान्स 6560 कोटींचा आयपीओ (Bajaj Housing Finance IPO) आणला आहे. यासाठी किंमत पट्टा (प्राईस बँड) 66-70 रुपये प्रतिसमभाग दरम्यान ठेवण्यात आला आहे. 9 सप्टेंबर ते 11 सप्टेंबरदरम्यान हा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुला असणार आहे. या आयपीओमध्ये कंपनीचे 3560 कोटींचे नवे समभाग (फ्रेश इश्यू) जारी केले जाणार असून बजाज फायनान्सचे 3 हजार कोटींचे समभाग (ऑफर फॉर सेल) विक्रीस उपलब्ध असणार आहेत.

निवृत्त पेन्शनधारकांना जवळच्या कोणत्याही बँकेतून पेन्शन काढता येणार

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमार्फत (ईपीएफओ) चालवणार्‍या कर्मचारी निवृत्तीवेतन योजना 1995 (ईपीएस 95) अंतर्गत असणार्‍या निवृत्त पेन्शनधारकांना कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून पेन्शन काढता येणार. याचा सुमारे 78 लाख निवृत्तीधारकांना फायदा होणार. बरेच निवृत्त नागरिक निवृत्तीपश्चात दुसर्‍या गावी स्थायिक होतात. अशा लोकांना आता नजीकच्या शाखेतून दरमहा पेन्शन घेता येणार. यापूर्वी पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ) हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पार पाडावी लागत होती. 1 जानेवारी 2025 पासून ही नवीन यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. या नवीन प्रणालीमुळे निवृत्तीवेतन (पेन्शन) वितरणाचा सरकारचा खर्चदेखील कमी होणार असल्याचे समजते.

पीएनजी ज्वेलर्स लवकरच भांडवल बाजारात

महाराष्ट्रातील महत्त्वाची सुवर्णपेढी पीएनजी ज्वेलर्स लिमिटेड लवकरच आयपीओद्वारे भांडवल बाजारात उतरणार. पीएनजी ज्वेलर्स आयपीओमार्फत 1100 कोटींचा निधी उभा करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 10 ते 12 सप्टेंबरदरम्यान हा आयपीओ खुला राहणार असून याचा किंमत पट्टा (प्राईस बँड) 456 रु. ते 480 रुपये प्रतिसमभाग इतका ठेवण्यात आला आहे. किमान एक लॉट 31 समभागांचा (शेअर्स) आहे. 480 रुपये किमतीनुसार अर्ज करणार्‍यास 1 लॉटसाठी किमान 14880 रुपये गुंतवणूक करावी लागणार आहे.

राज्यात 1 लाख 17 हजार कोटींची नवी गुंतवणूक होणार

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चार बड्या उद्योग प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. यामध्ये पनवेलमध्ये टॉवर सेमीकंडक्टर आणि अदानी समूह यांचा एकत्रित 58763 कोटींची पहिल्या टप्प्यातील गुंतवणूक असलेला प्रकल्प आहे. दुसर्‍या टप्प्यात पुन्हा 25184 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. यामुळे 15 हजार रोजगारनिर्मिती होईल. दुसरा प्रकल्प पुण्यात स्कोडा आणि फोक्सवॅगन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू होईल. वाहननिर्मिती प्रकल्पामध्ये एकूण 12 हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून 1 हजार लोकांसाठी रोजगारनिर्मिती क्षमता असलेला हा प्रकल्प आहे. यानंतर तिसरा प्रकल्प टोयोटा किर्लोस्कर या आणखी एक वाहन उत्पादक कंपनीचा असून छत्रपती संभाजी महाराजनगरमध्ये या प्रकल्पाअंतर्गत 21,763 कोटींची गुंतवणूक होणार असून एकूण 12 हजार जणांना रोजगार मिळेल. चौथा प्रकल्प अमरावतीमध्ये होणार असून नांदगाव पेठ एमआयडीसीमध्ये विविध कापड उद्योगासंबंधी 188 कोटी रुपये गुंतवणुकीचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. 550 जणांना थेट रोजगार उपलब्ध होईल. एकूण सर्व प्रकल्पांची गोळाबेरीज पाहता 1 लाख 17 हजार कोटींची नवी गुंतवणूक राज्यात नव्याने होणार आहे.

विद्युत दुचाक्यांचे उत्पादन करणारी एअर एनर्जी भांडवल बाजारात

विद्युत दुचाक्यांचे उत्पादन करणारी एअर एनर्जी आयपीओद्वारे भांडवल बाजारात उतरणार. एकूण 3500 ते 4000 कोटींचा निधी उभारण्याचे कंपनीचे उद्दिष्ट. सध्या विद्युत दुचाक्यांच्या बाजारात एअर एनर्जीचा हिस्सा 12 टक्के इतका आहे. या क्षेत्रात ओला इलेक्ट्रिक (31 टक्के बाजार हिस्सा) आणि टीव्हीएस मोटर्स (20 टक्के बाजार हिस्सा) यानंतर एथर एनर्जी तिसर्‍या क्रमांकाची मोठी कंपनी आहे.

व्होडाफोन आयडियाचे एल 900, एल 2100 तंत्रज्ञान महाराष्ट्रात कार्यान्वित

व्होडाफोन आयडिया कंपनीने एल 900, एल 2100 तंत्रज्ञान महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजी महाराजनगर, सोलापूर, ठाणे, अहमदनगर या ठिकाणी कार्यान्वित केले. फॉलोअप पब्लिक ऑफरमध्ये जमा झालेल्या निधीचा वापर कंपनीच्या पायाभूत सुविधा अद्ययावत करण्यासाठी येणार असल्याचे कंपनीमार्फत सांगण्यात आले.

विदेश चलन गंगाजळीत गेल्या सप्ताहात विक्रमी वाढ

भारताच्या विदेश चलन गंगाजळीत 30 ऑगस्ट रोजी संपलेल्या सप्ताहात विक्रमी वाढ झाली. या सप्ताहअखेर विदेश चलन गंगाजळी 2.3 अब्ज डॉलर्स वधारून नव्या विक्रमी 683.99 अब्ज डॉलर्सच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news