

पनवेल : पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील खारघर परिसरात मतदारांना पैसे वाटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार घडला. खारघर सेक्टर 20 येथील यश एव्हेन्यू परिसरात बुधवारी सायंकाळी काही कार्यकर्ते मतदारांना पैसे वाटप करण्याच्या तयारीत असल्याची
माहिती मिळाल्यानंतर भरारी पथकाने तेथे धाव घेतली मात्र पथकाचा सुगावा लागल्याने संबंधित कार्यकर्त्यांनी घटनास्थळीच 2 लाख 13 हजार रुपयांची रोख रक्कम टाकून पलायन केल्याची घटना घडली.
या ठिकाणी रोख रकमेबरोबरच मतदारांच्या नावांच्या चिठ्ठ्याही आढळून आल्याने हा प्रकार मतदारांना थेट प्रलोभन देण्यासाठीच होता, असा संशय अधिक बळावला आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी तत्काळ माहिती दिल्यानंतर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
भरारी पथकाने घटनास्थळी आढळलेली रोख रक्कम व कागदपत्रे ताब्यात घेत पंचनामा केला असून, या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. सदर रक्कम कोणाच्या वतीने आणण्यात आली होती, ती कोणत्या उमेदवार किंवा पक्षाशी संबंधित आहे का, तसेच या प्रकरणामागे नेमकी कोणाची भूमिका आहे, याचा तपास निवडणूक यंत्रणेमार्फत करण्यात येत आहे.