

नागपूर : गिरगावजवळील बाबुलनाथ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या जागेचा (भाडेपट्टा) प्रश्न शासनाने निकाली काढला आहे. जागेचा भाडेपट्टा आता बाबुलनाथ चॅरिटी ट्रस्टला एक रुपया या नाममात्र दराने 30 वर्षांसाठी नूतनीकरण करून देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत ही माहिती दिली.
या निर्णयानुसार मलबार-कंबाला हिल येथील एकूण 718.23 चौ.मी. क्षेत्रफळापैकी 135 चौ.मी. क्षेत्राचा वापर हा वाणिज्यिक कारणांसाठी होत असल्याने ते क्षेत्र वगळण्यात आले आहे. उर्वरित 583.23 चौ.मी. जागेचा वापर हा केवळ बाबुलनाथ मंदिराकडे जाणाऱ्या मार्गिकेसाठी (पायऱ्या व रस्ता) होत असल्याने, या जागेचा भाडेपट्टा नूतनीकरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. बाबुलनाथ मंदिर हे मुंबईतील अतिशय प्राचीन आणि जागृत शिवमंदिर आहे. श्रावण महिना आणि महाशिवरात्रीला येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या आणि मार्गिकेची जागा ही शासकीय जमीन होती.
या लीजचे नूतनीकरण वेळेवर
न झाल्याने काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. तसेच, मलबार हिलसारख्या उच्चभ्रू आणि महागड्या परिसरात ही जागा असल्याने त्याचा बाजारभावानुसार कर भरणे चॅरिटी ट्रस्टला अवघड झाले होते. या जागेच्या भाडेपट्ट्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. शासनाने आता यावर कायमस्वरूपी तोडगा काढला आहे.1 जानेवारी 2012 पासून पुढील 30 वर्षांच्या कालावधीसाठी हे नूतनीकरण लागू असेल. यासाठी शासनाने केवळ 1 रुपया इतका नाममात्र वार्षिक दर आकारून बाबुलनाथ चॅरिटी ट्रस्टच्या नावे भाडेपट्टा करार करण्यास मंजुरी दिली आहे.