

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : 'बम बम भोले, ओम नम: शिवाय, हर हर महादेव', असा अखंड जयघोष करत महाशिवरात्रीनिमित्त मुंबईतील विविध शिव मंदिरे भाविकांनी गजबजून गेली होती. विशेषत: दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मुंबईसह उपनगरे, विरार, कल्याण डोंबिवली, पनवेलसह विविध भागातील भक्त मंदिरात दर्शनासाठी आले होते. पहाटेपासून मंदिर परिसरात २ ते ३ किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. मंदिर प्रशासनाने मंदिराला आकर्षक फुलांची सजावट केली होती. (Mahashivratri 2025)
महाशिवरात्रीचा दिवस शिवभक्तांसाठी जणू उत्सव असतो. पहाटेच शंभू महादेवाचे दर्शन घेऊन पूजा, अभिषेक करण्यासाठी शिवभक्तांच्या रांगा लागल्या होत्या. शिव दर्शनासाठी भाविक भक्तीत तल्लीन झाले होते. मंदिराबाहेर जवळपास दीड ते दोन किलोमीटर पर्यंत रांगेत उभारून जयघोष करत होते. बाबुलनाथ मंदिराच्या रस्त्यावर वाहतुकीची समस्या निर्माण होऊ नये. कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. भाविकांना उन्हाचा त्रास जाणवू नये, यासाठी मंदिर प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. तसेच अतिरिक्त स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत.
शिवलिंगावर जलाभिषेकाबरोबर दूध, उसाचा रस, दही , श्रीखंड यांचा अभिषेक केला जातो. मात्र, बाबुलनाथ मंदिरात महाशिवरात्रीला फक्त पाण्याचा अभिषेक करण्याची प्रथा आहे. जलाभिषेकासोबत फुले आणि बिल्वची पाने अर्पण केली जातात. मंदिरात येणाऱ्या अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
महाशिवरात्रीनिमित्त बाबुलनाथ येथील शिवमंदिरांना जाणाऱ्या भाविकांसाठीही अतिरिक्त बसगाड्या सोडण्यात आल्य होत्या . ५७, ६७ आणि १०३ क्रमांकाच्या एकूण ८ बसगाड्या सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यंत सुरू असल्याने भाविकांची सोय झाली.