

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार झीशान सिद्दीकी यांना ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. "जशी तुझ्या वडिलांची हत्या केली, तशीच तुझीही हत्या केली जाईल," असे ईमेलमध्ये म्हटले आहे. या धमकीसोबतच झीशान सिद्दीकीकडे 10 कोटी रुपयांची मागणीही करण्यात आली आहे. मुंबई पोलीस या संपूर्ण प्रकरणाची सखोल तपासणी करत आहेत.
या संदर्भात प्रतिक्रिया देताना झीशान सिद्दीकी यांनी सांगितले की, “मला डी कंपनीकडून मेलद्वारे धमकी मिळाली आहे. मेलच्या शेवटी स्पष्टपणे याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यांनी माझ्याकडे 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. पोलिसांनी यासंबंधी सविस्तर माहिती घेतली असून, माझा जबाबही नोंदवला आहे. या घटनेमुळे आमचा संपूर्ण परिवार खूपच अस्वस्थ झाला आहे.”
12 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर त्यांच्या मुलाच्या काँग्रेस कार्यालयाबाहेर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. लीलावती रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. या खून प्रकरणात मुंबई पोलिसांनी आतापर्यंत शिवकुमार गौतम या मुख्य शूटरसह 26 आरोपींना अटक केली आहे. अनमोल बिश्नोई या प्रकरणातील फरार आरोपी आहे. 30 नोव्हेंबर 2024 रोजी अटकेत घेतलेल्या 26 आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मकोका) कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.