

पुढारी ऑनलाईन डेस्क: Leader of the Opposition | विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांनी आज (दि.८) अर्ज दाखल केला आहे. अध्यक्षपदासाठी महायुती सरकारकडून नार्वेकर यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. राहुल नार्वेकर यांना दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदाची संधी मिळणार आहे. दरम्यान माध्यमांशी बोलताना नार्वेकर म्हणाले, "विधासभेत विरोधी पक्षनेता कोण असेल? किंवा विरोध पक्ष नेता कोणाला बनवावे, हा संपूर्ण अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा असतो".
पुढे नार्वेकर म्हणाले, अजून मी विधानसभेचा अध्यक्ष नाही. परंतु प्राप्त परिस्थिती, भूतकाळातील अशाप्रकारच्या घटना आणि संविधानातील समाविष्ट असणाऱ्या तरतुदी यावरून विधानसभा अध्यक्ष सभागृह संबंधित सर्व निर्णय घेतात. विधानसभा अध्यक्ष हे संविधानिक पद आहेच. पण १३ कोटी जनतेतून निवडून आलेले २८८ आमदार हे जनतेच्या आशा आकांक्षा मांडण्यासाठी सभागृहात येतात. जर या २८८ सदस्यांना न्याय दिला नाही तर महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेबरोबर अन्याय घडू शकेल म्हणून विधानसभा अध्यक्ष हे पद अत्यंत महत्त्वाचेच नव्हे तर संसदीय लोकशाहीला जपण्यासाठी हे पद फारच महत्त्वाचे आहे, असे मत राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले.
"विधासभा निवडणुकीनंतर निवडणुक आयोगावर निर्माण झालेल्या प्रश्नावर बोलताना नार्वेकर म्हणाले, विरोधी पक्षातील नेत्यांनी संविधानिक संस्थांवर बिनबुडाचे आरोप करणे, हे संसदीय लोकशाहीसाठी घातक आहे. त्यामुळे माझी सर्व पक्ष आणि सदस्यांना माझी विनंती असेल की, संविधानिक संस्थांवर असे आरोप करून त्यांचा मान घालवू नका", असे देखील राहुल नार्वेकर यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.