समीर वानखेडे यांना उद्या पुन्हा सीबीआयचे पाचारण

Sameer Wankhede
Sameer Wankhede

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  आर्यन खान प्रकरणात एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांना उच्च न्यायालयाने 8 जूनपर्यंत अटकेपासून दिलासा दिला आहे. मात्र, वानखेडे यांना माध्यमांशी बोलण्यास व शाहरूख खानसोबतचे चॅट जाहीर करण्यास मनाई करण्यात आली आहे. दुसरीकडे, सीबीआयने वानखेडे यांना पुन्हा समन्स बजावले असून, 24 मे रोजी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

आर्यन खानच्या सुटकेसाठी 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून सीबीआयने वानखेडे यांच्यावर गुन्हा नोंदवला असून, त्याविरोधात वानखेडे उच्च न्यायालयात गेले आहेत. आज सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांना 8 जूनपर्यंत अटकेपासून दिलासा दिला असला, तरी त्यांना शाहरूखसोबतचे चॅट जाहीर करण्यास व माध्यमांशी न बोलण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, कुटुंबीयांना चार दिवसांपासून धमक्या येत असल्याचे कारण देत वानखेडे यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांकडे सुरक्षेसाठी अर्ज केला आहे.

सोमवारी न्यायालयात सीबीआयने आरोप केला की, शाहरूख खानसोबतचे चॅट आपल्या कामावरील निष्ठेचे प्रमाणपत्र म्हणून वानखेडे सादर करू पाहत आहेत. वानखेडे यांना अटकेपासून संरक्षण देण्यास विरोध करताना सीबीआयच्या वकिलांनी सांगितले की, अटक होणार असेल तर असे संरक्षण देण्याचे आदेश न्यायालय देऊ शकते; पण चौकशी सुरू असताना कितीही काळासाठी असे अंतरिम आदेश देता येत नाहीत. वानखेडे यांच्या वकिलांनी हे प्रकरणच मुळात बेकायदा असल्याचा दावा करीत प्रमाणिक अधिकार्‍याला संकटात आणण्याचा हा प्रकार असल्याचे ते म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news