

मुंबई: कुख्यात डॉन अरुण गवळी यांची दुसरी मुलगी योगिता ही सुद्धा राजकारणात सक्रिय झाली आहे. येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भायखळा प्रभाग क्रमांक २०७ मधून नगरसेविका बनण्याचा तिचा मानस आहे. या अगोदर गवळी यांची कन्या गीता गवळीसह तीन नगरसेवक मुंबई महानगरपालिकेवर निवडून गेले होते.
अरुण गवळी यांच्या अखिल भारतीय सेनेचा बायकाळा परिसरात बऱ्यापैकी दबदबा आहे. समाजामध्ये व्हाईट कॉलर जगता यावे यासाठी गवळी यांनी १९९६ मध्ये अखिल भारतीय सेनेची स्थापना केली होती. २००४ मध्ये त्यावेळीच्या चिंचपोकळी विधानसभा मतदारसंघातून अरुण गवळी विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले होते. तत्पूर्वी २००२ मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गवळी यांचे राईटहॅन्ड सुनील घाटे नगरसेवक म्हणून निवडून आले होते.
२००७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत गवळी यांनी आपली मोठी मुलगी गीता गवळी व वहिनी वंदना गवळी यांना निवडणूक रिंगणात उतरवले. या दोघीही विजयी झाल्या. त्यामुळे महापालिकेत गवळी यांचे दोन नगरसेवक भायखळा परिसराचे नेतृत्व करू लागले. त्यानंतर २०१२ मध्येही महापालिका निवडणुकीत दोघी निवडून आल्या. मात्र २०१७ मध्ये वंदना गवळी यांचा पराभव झाला. तर गीता गवळी पुन्हा नगरसेविका बनल्या.
आता गवळी यांची दुसरी कन्या योगिता नगरसेविका बनण्यासाठी तयारीला लागली आहे. प्रभाग क्रमांक २००७ मधून महापालिका निवडणूक लढवण्यासाठी तिने या प्रभागात जनसेवेचे काम हाती घेतले आहे. दररोज प्रभागातील नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन, त्यांच्या समस्या समजून घेत आहे. २००७ प्रभाग आरक्षणात खुल्या प्रवर्गात गेल्यामुळे योगिता हिने आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे. या प्रभागातून २०१७ मध्ये भाजपाचे स्थानिक नेते रोहिदास लोखंडे यांच्या पत्नी सुरेखा लोखंडे निवडून आल्या होत्या. यावेळी हा प्रभाग खुला झाल्यामुळे येथे स्वतः रोहिदास लोखंडे निवडणूक लढवण्याची तयारी करीत आहेत. २०१७ मध्ये याच प्रभागातून गवळी यांची वहिनी वंदना गवळी यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचा अवघ्या ३४४ मतांनी पराभव झाला होता.
वंदना गवळी शिंदेंकडे
अरुण गवळी यांची वहिनी वंदना गवळी सध्या शिवसेना शिंदे गटामध्ये आहे. त्यामुळे त्यांना प्रभाग क्रमांक २०७ किंवा प्रभाग क्रमांक १९९ मधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक २०७ मध्ये पुतणी निवडणूक लढवणार असल्याने वंदना गवळी १९९ प्रभागासाठी आग्रही राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
२०७ प्रभागात २०१७ मध्ये पडलेली मते
सुरेखा लोखंडे भाजपा - ६,००५
आशा चव्हाण शिवसेना - ५,९६२
वंदना गवळी, अभासे - ५,६६१