मुंबई : डोंबिवलीचा तरुण अर्णव खैरे या तरुणाने लोकलमध्ये झालेल्या मारहाणीचा धसका घेत केलेल्या आत्महत्येवरून मुंबईत मराठी-अमराठी वाद पेटला आहे. केवळ हिंदी बोलला म्हणून अर्णवला मारहाण झाली. त्यावरून भाजपने मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षाला जबाबदार धरत शनिवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर आंदोलन केले.
भाषा, प्रांत यांच्या आधारे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे राजकारण काही राजकीय पक्ष आणि राजकीय व्यक्ती करत आहेत. अशा लोकांना आणि पक्षांना ‘सद्बुद्धी द्या’ अशी प्रार्थना भाजपनेत्यांनी स्मृतिस्थळी केली. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वात झालेल्या या अनोख्या आंदोलनात तोंडाला काळी पट्टी बांधून, हातामध्ये फलक घेऊन भाजप नेते-कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यात आमदार प्रसाद लाड, अतुल भातखळकर आदींचा समावेश होता. भाजपच्या या आंदोलनामुळे वादविवाद होऊन परिस्थिती हाताबाहेर जाईल म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
भाजपने एका तरुणाच्या मृत्यूवरून खालच्या स्तरावरचे घाणेरडे राजकारण करू नये. ज्यावेळेस ट्रेनमधून पाच माणसे पडली तेव्हा भाजपला येथे येऊन कोणाच्या पाया पडावे आणि बुद्धी द्यावी, असे वाटले नाही का?, तेव्हा अश्विनी वैष्णव यांच्याकडे जाऊन लोकल व्यवस्थित चालावी म्हणून सुबुद्धी द्यावी असे वाटले नाही काय?, अशा शब्दांत ठाकरे गट आणि मनसेने भाजपाला प्रत्युत्तर दिले. या प्रकरणातील तथ्य उघडकीला आणून दोषींना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करणारे निवेदन मनसेसह शिंदे गटाच्या शिवसेनेने पोलिसांना दिले आहे.