

कोपरखैरणे : नवी मुंबईतील सीवुड्स सेक्टर 42 येथील संगम गोल्ड हे ज्वेलर्स तीन बुरखा घातलेल्या चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवत सोन्याचे दागिने लुटले. दुकानातील किती ऐवज चोरी झाला याची माहिती उशिरापर्यंत मिळाली नाही.
आज सकाळी पावणे अकराच्या सुमारास येथील कायम गजबजलेल्या गायमुख चौकातील संगम गोल्ड दुकानात तीन बुरखाधारी चोरटे शिरले. त्यांनी बंदुकीचा धाक दाखवत ही लूट केली.
10 ते 12 मिनिटांत लूट
ही घटना घडली तेव्हा नुकतेच दुकान उघडल्याने ग्राहक कोणी नव्हते. दुकानात एकटेच मालक होते. त्यांनी दुकानाची नियमित साफ साफाई करून देवाला दिवाबत्ती करीत दागिने तिजोरीतून काढून दर्शनी भागात (शो केस मध्ये) जवळपास लावले होते. तेवढ्यात दुकानात तीन बुरखाधारी व्यक्ती आल्या. त्यांच्यापैकी एकाने दुकान मालकावर बंदूक रोखून धरली. अन्य दोघांनी दिसतील ते दागिने पटापट जवळच्या पिशवीत भरले आणि पळून गेले. ही चोरी केवळ 10 ते 12 मिनिटांत घडली.
आठ पथके स्थापन
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळांसह सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आले. पंचनामा केला. दरम्यान गुन्हे शाखेचे पथक श्वान पथकांसह आले. मात्र श्वान काही अंतरावर जाऊन घुटमळले. या घटनेची नोंद घेण्यात आली असून चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांची चार आणि गुन्हे शाखेची चार पथके तपास करीत आहेत. लवकरच चोरटे गजाआड होतील अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांनी दिली.