Navi Mumbai crime : तुर्भे येथे गांजा विक्रेत्याला पुन्हा अटक
कोपरखैरणे : तुर्भे पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात कारवाई करत बाबा गल्ली परिसरातून सराईत गांजा विक्रेत्याला अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव पंकज प्रदीप हलवाई (वय 38) असे असून त्याच्याकडून सुमारे 5 हजार रुपये किमतीचा 238 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. मात्र या कारवाईनंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर व जप्त केलेल्या अल्प गांजाबाबत संशय व्यक्त केला आहे.
पंकज हलवाई हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी तीन गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. 2019 व 2025 साली एनडीपीएस कायद्यान्वये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच 2023 मध्ये अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करून प्रतिबंधित पदार्थ विक्रीप्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. एवढा गुन्हेगारी इतिहास असतानाही आरोपी खुलेआम नशेची विक्री करत असल्याने पोलिसांच्या दक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
तुर्भे स्टोअर्स येथील बाबा गल्ली परिसर हा नशेच्या सौदागरांचा अड्डा बनल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. पोलिसांच्या नजरेसमोर फूड व्हॅनमधून दारू विक्री होत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. गस्त घालणाऱ्या पथकांना सर्व माहिती असूनही ते दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. अशा पार्श्वभूमीवर केवळ 238 ग्रॅम गांजाची जप्ती ही संशयास्पद असल्याचे नागरिकांचे मत आहे.
परिसरात वाढत चाललेल्या नशामुळे तरुण पिढी अधोगतीकडे जात असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे. तुर्भे परिसर नशामुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, तसेच सराईत गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत कठोर कारवाई करावी, अशी मागणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे करण्यात येत आहे.

