

मुंबई ः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सोमवारी आपली सात उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. त्यामध्ये राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जागी त्यांचे चिरंजीव सलील देशमुख यांना काटोल मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. अनिल देशमुख यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे.
तांत्रिक कारण काढून माझा अर्ज रद्द करण्याचे नियोजन सत्ताधार्यांनी केले होते. त्यामुळे मी सलील यांना उमेदवारी दाखल करण्यास सांगितले, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शरद पवार गटाने सातारा जिल्ह्यातील माणमधून प्रभाकर घार्गे यांना, तर वाईमधून अरुणादेवी पिसाळ यांना संधी दिली आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूरमधून वैभव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शरद पवार गटाने 24 ऑक्टोबर रोजी आपल्या 45 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. शरद पवार गटाने आतापर्यंत 83 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.