

मुंबई : मेट्रो-९ मार्गिकेच्या दहिसर ते काशिगाव या पहिल्या टप्प्याची आरडीएसओ चाचणी पूर्ण झाली असून सध्या मेट्रो-७ आणि मेट्रो-९ यांच्या एकात्मिकरणाची कामे सुरू आहेत. त्यामुळे आता अंधेरीवरून थेट मिरा-भाईंदर गाठणे शक्य होणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील मिरा-भाईंदर परिसर आता मेट्रो मार्गाने मुंबई महानगरपालिका क्षेत्राशी जोडला जाणार आहे. दहिसर पूर्व ते काशिगाव या मार्गावर मेट्रो-९ मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याची आरडीएसओ चाचणी गेल्या महिन्यात पर्ण केल्यानंतर आता इतर काही चाचण्या सुरू आहेत. मेट्रो ७वरून आलेली गाडी थेट मेट्रो-९ मार्गिकेवर वळवण्याची चाचणी घेतली जात आहे. ही मार्गिका सुरू झाल्यानंतर गुंदवली म्हणजेच अंधेरी पूर्व येथून आलेली मेट्रो गाडी थेट काशिगाव मेट्रो स्थानकापर्यंत जाऊ शकेल.
मेट्रो-९ मार्गिका हा ठाणे जिल्ह्यातील पहिला मेट्रोमार्ग आहे. दहिसर पूर्व येथे ही मार्गिका मेट्रो-७ मार्गिकेशी थेट जोडली जाईल. तसेच याच ठिकाणी मेट्रोगाडी बदलून मेट्रो-२ अ मार्गिकेवरही जाता येणार आहे. मेट्रो-९ मार्गिका ४.४ किमी लांबीची आहे.
विमानतळ ते मिरा-भाईंदर थेट प्रवास
मेट्रो ७ मार्गिकचा विस्तार असलेली मेट्रो ७अ मार्गिका आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडली जाणार आहे. त्यामुळे मेट्रो-७ अ, ७ आणि ९ याद्वारे प्रवास करताना आंतरराष्ट्रीय विमानतळापासून थेट मिरा-भाईंदर गाठता येणार आहे. मेट्रो ९ आणि मेट्रो-२ अ यांद्वारे लिंक रोडशी जोडणी मिळणार आहे. तसेच भविष्यात मिरागाव येथे मेट्रो-१० द्वारे ठाण्यातील गायमुखपर्यंत प्रवास करता येणार आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस स्थानक येथून मेट्रो-१३ मार्गिकच्या माध्यमातून वसई-विरार गाठता येणार आहे. मेट्रो-९ सुरू झाल्यानंतर दहिसर टोलनाक्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.