

मुंबई: आयकर विभाग आणि क्राईम ब्रँचचे अधिकारी असल्याचे भासवून अंधेरीतील एका कार्यालयात बेकायदा प्रवेश करून व्यावसायिकाचे अपहरण करण्याची धमकी देत एक कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीचा अंधेरी पोलिसांनी पर्दाफाश केला.
या प्रकरणात पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. आरोपींनी बनावट शासकीय ओळखपत्रांचा वापर करून कारवाईचा बनाव केल्याचे तपासात समोर आले.
राजकुमार कंडासामी (४९) यांच्या कार्यालयात नऊ जणांचा समूह आला होता. त्यात सहा पुरुष आणि तीन महिलांचा समावेश होता. त्यांनी आपण आयकर विभाग तसेच क्राईम ब्रँचमधील अधिकारी आणि कर्मचारी असल्याचे बनावट ओळखपत्राद्वारे भासवत त्यांच्या कार्यालयात प्रवेश केला.
तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीचे अपहरण करण्याची तसेच कार्यालयातील १० कर्मचाऱ्यांचे फोन काढून घेऊन त्यांना कार्यालयाबाहेर जाण्यास मज्जाव करण्याची धमकी दिली. कायदेशीर कारवाईची भीती दाखवत शिवीगाळ करून कारवाई टाळण्यासाठी एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.
राजकुमार कंडासामी याने अंधेरी पोलिसात नऊ अज्ञात व्यक्तींविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी सहा जणांना अटक केली. यामध्ये संतोष उदय खोपटकर (३७), विनय रमेश मोरे (३७), प्रेम किशन सबनानी (५०), प्रज्ञा हरीश माईन (२७), रेश्मा शामराव वारंग (४१) आणि सबीना हाफिज शेख (४८) यांचा समावेश आहे.
मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त दत्तात्रय नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.