

मुंबई : विकासकाने संगनमताने सोसायटीच्या कमिटीची दिशाभूल करून बेकायदेशीरपणे सोसायटी एसआरए योजनेत ढकलल्याचा आरोप कवी, कलाकार किशोर कदम यांनी समाजमाध्यमांतून यापूर्वी केला होता. आता काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदाराला इमारतीचे काम देण्याचा घाट विकासकाने घातल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अंधेरीतील चकाला येथे हवा महल सोसायटीत किशोर कदम राहतात. कदम यांनी केलेल्या आरोपानुसार पीएमसी आणि विकासक हे भागीदार आहेत. त्यांनी संगनमताने कमिटीची दिशाभूल करत पुनर्विकास प्रक्रियेत प्रचंड गोंधळ घातला आहे.
पीएमसी असलेल्या रॅडिअस अॅण्ड असोसिएट्सचे तेजस शहा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल असून त्यांचे वास्तुविशारद म्हणून असलेले लायसन्सही रद्द करण्यात आले आहे. तरीही ते सोसायटीत स्ट्रक्चरल इंजिनीअर म्हणून काम करत आहेत.
ज्या पालिकेने शहा यांच्यावर गुन्हा दाखल केला त्याच पालिकेने त्यांंना हे काम दिले आहे. पत्ता बदलून, वेगळी कंपनी काढून शहा हे पुन्हा तोच गुन्हा आमच्या सोसायटीत करू पाहात आहेत, असा आरोप कदम यांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून सहकार सचिव प्रवीण दराडे आणि एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांना या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले आहे. यामुळे कदम यांना दिलासा मिळाला आहे.
मानसिक त्रास
कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार गैरव्यवहाराविरोधात आवाज उठवल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास दिला जात आहे. 12 सप्टेंबरला रात्री आठ वाजून त्रेपन्न मिनिटांनी एक अनोळखी महिला सोसायटीमध्ये शिरली. कदम कुटुंबीयांबद्दल तिने चौकशी केली. शेवटी त्यांच्या दाराशी गेली. तिने बेल वाजवली, कडी वाजवली. मग वरच्या मजल्यावर गेली. वर तीन मिनिटे थांबली आणि पुन्हा दाराबाहेर येऊन तिने बेल वाजवली, कडी वाजवली. मग खालच्या मजल्यावर गेली. तिथे ती सहा मिनिटे थांबली आणि नऊ वाजून सहा मिनिटांनी गेटबाहेर गेली. हे सगळे दाराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यात रेकॉर्ड झाले आहे.