

Maharashtra Politics
मुंबई: अबू आझमी ही महाराष्ट्राला लागलेली कीड असून कायम प्रक्षोभक वक्तव्य करून महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचे काम करत असल्याने सरकारने त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना आज (दि.२३) केली.
आषाढी वारीला ८०० वर्षाची परंपरा आहे. आषाढी वारी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक ओळख आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीवरुन पालखी निघते.संत तुकारामांच्या देहू येथूनही पालखी निघते. लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जातात. त्यावेळी मुस्लिम समाजाचे अनेक बांधव त्या वारीत सहभागी होतात आणि वारकर्यांना सेवा देतात याची आठवणही आनंद परांजपे यांनी अबु आझमी यांना करून दिली आहे. कायम हिंदू - मुस्लिम राजकारण करुन अबु आझमी प्रक्षोभक वक्तव्य करत आहेत त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई सरकारने करावी, असे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना परांजपे यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे. त्यामुळे मराठी भाषेचे कुठेही नुकसान होईल अशा प्रकारचा निर्णय महायुतीचे सरकार कधीही घेणार नाही, अशा शब्दांत एका प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी भूमिका स्पष्ट केली. मराठी भाषा महाराष्ट्राची आहे. अभिजात भाषेचा दर्जा हा लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. हेदेखील विसरता कामा नये. राज्य सरकार मराठी भाषेविषयी संवेदनशील आहे, असेही त्यांनी सांगितले.
छत्रपती संभाजी महाराजांना पकडून क्रूर पध्दतीने हालहाल करुन हत्या केली, हा इतिहास महाराष्ट्र कधी विसरु शकणार नाही. त्यामुळे अशा औरंग्या प्रवृत्तीला महाराष्ट्रात कुठेही स्थान नाही. औरंगजेबाचे उदात्तीकरण कधीही महाराष्ट्र सहन करणार नाही, असा इशारा परांजपे यांनी दिला.