

पुढारी ऑनलाईन डेस्कः समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांच्या विधानाने वाद उद्भवण्याची शक्यता आहे. अधिवेशनासाठी उपस्थित असलेल्या आमदार अबू आझमी यांनी देशभरात औरंजेबाची चुकीची प्रतिमा रंगवली जात असल्याचे म्हटले आहे. औरंगजेबाच्या कार्यकाळात देशाचा जीडीपी २४ टक्के होता असा जावईशोध त्यांनी लावला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत विचारले असता त्यांनी आझमी यांचे विधान अत्यंत चुकीचे असल्याचे म्हटले आहे. त्यांना सडेतोड प्रत्यूत्तर देत आझमी यांनी माफी मागावी असे म्हटले आहे.
सध्या ‘छावा’ चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाविषयी देशभरात चर्चा होत आहे. सर्वच स्तरातून या चित्रपटाविषयी चांगल्या प्रतिक्रीया उमटत आहेत. सत्ताधारी पक्षानेही या चित्रपटाचे कौतुक केले आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांचा देदिप्यमान इतिहास मांडला आहे. पण आझमी यांनी याबद्दल धक्कादायक विधान केले आहे.
अबू आझमी यांनी छत्रपती संभाजीराजे व औरंगजेब याच्यातील युद्धाविषयी बोलताना धक्कादायक विधान केले आहे. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता तसेच छत्रपती संभाजी महाराज व औरंगजेब यांच्यामध्ये धर्माची लढाई नव्हती सत्तेची होती असे देखील ते म्हणाले आहेत. पुढे त्यांनी यावर बोलताना म्हटले की औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तान पासून ब्रम्हदेशपर्यंत होती. त्याकाळात देशाचा जीडीपी २४ टक्के होता. त्यामुळे औरंगजेबाची प्रतिमा सध्या चुकीच्या पद्धतीने रंगवली जात आहे असा दावाही त्यांनी यावेळी केला. औरंगजेबाने त्याच्या काळात अनेक मंदिरांची उभारणी केली असेही ते म्हणाले.
आझमी यांच्या विधानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले आझमी यांचे विधान चुकीचे असून औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा ४० दिवस आत्यंतिक छळ केला हे सत्य आहे. अशा व्यक्तिला चांगले म्हणने म्हणजे पाप आहे. आझमी यांनी याप्रकरणी माफी मागितली पाहिजे. मुख्यमंत्री याची गंभीर दखल घेतील व योग्य ती कारवाई करतील. असेही ते म्हणाले.