

मुंबई: मुंबईतील एका विशेष न्यायालयाने सोमवारी केंद्रीय अन्वेषण विभागाला अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स ग्रुपचे (आरकॉम) माजी वरिष्ठ अधिकारी अमिताभ झुनझुनवाला यांना कथित बँक कर्ज फसवणूक प्रकरणात अटक करण्याची परवानगी दिली.
झुनझुनवाला यांना नवी दिल्लीच्या तिहार मध्यवर्ती कारागृहातून प्रॉडक्शन वॉरंटद्वारे विशेष सीबीआय न्यायाधीश जे. पी. दरेकर यांच्यासमोर हजर करण्यात आले होते. ईडीकडून चौकशी सुरू असलेल्या मनी लाँडरिंगच्या (आर्थिक गैरव्यवहार) एका संबंधित प्रकरणात झुनझुनवाला सध्या तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत.
त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर विशेष सरकारी वकील ए. लिमोसिन यांच्यामार्फत सीबीआयने अर्ज दाखल करून झुनझुनवाला यांना रीतसर अटक करण्याची आणि त्यांची कोठडी मिळण्याची परवानगी मागितली.
झुनझुनवाला यांचे वकील रिती उपाध्याय आणि मुदित जैन यांनी, दिल्ली न्यायालयाने जारी केलेल्या प्रॉडक्शन वॉरंटनुसार त्यांना 5 जून रोजीच मुंबई न्यायालयासमोर हजर करणे आवश्यक होते.
त्यामुळे त्या तारखेपूर्वी त्यांना न्यायालयात हजर करणे हे बेकायदेशीर आहे, असा दावा त्यांनी केला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सीबीआयची मागणी मान्य करत आरोपीला कायद्यानुसार रीतसर अटक करण्याची परवानगी दिली.