

मुंबई: मनसे नेते अमित ठाकरे यांच्या सूचनेनंतर मनसे कार्यकर्त्यांनी पुण्यातील शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटविला होता. या प्रकरणाचे पडसाद मंगळवारी मुंबईत उमटले.
एकीकडे अमित ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर, दुसरीकडे भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी माहिममध्ये आंदोलन केले. भाजप कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या दादर येथील ‘शिवतीर्थ’ निवासस्थानाकडे जाण्याचा पवित्रा घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पुण्यातील शासकीय महाविद्यालयाच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेजवळ असलेल्या पंतप्रधान मोदी यांचा फोटोला अमित ठाकरे यांनी सोमवारी आक्षेप घेतला. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी तो फोटो हटविला.
या घटनेचे मंगळवारी मुंबईत पडसाद उमटले. भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. आंदोलनानंतर भाजयुमो कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या दादर येथील ‘शिवतीर्थ’ निवासस्थानाकडे जाण्याचा आग्रह धरला केला.
मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना रोखले. दरम्यान, माहिम परिसरात भाजप आणि मनसे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने दोन्ही गटांमध्ये धक्काबुक्की झाली.दरम्यान, भाजयुमोचे कार्यकर्ते शिवतीर्थावर येणार असल्याची माहिती पसरताच मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवतीर्थावर जमले.
भाजप कार्यकर्त्यांना आंदोलन करायचे असल्यास त्यांनी आझाद मैदानात करावे; शिवतीर्थावर आल्यास उत्तर दिले जाईल, असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सुनावले. तर, आम्ही शांतपणे आंदोलन करण्यासाठी गेलो होतो, मात्र मनसेच्या गुंडांनी आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. काचेच्या बॉटल्स फेकून हिंसक वातावरण तयार केले, असा आरोप महाडिक यांनी केला.