kolhapur Municipal elections | उमेदवारांच्या चाचपणीसाठी महायुतीची उपसमिती
कोल्हापूर : महानगरपालिकेवर भगवा फडकविण्यासाठी महायुतीच्या वतीने एकत्र निवडणुका लढविण्याचा निर्णय महायुतीतील प्रमुख पक्षांच्या जिल्ह्यातील नेत्यांच्या बैठकीत शुक्रवारी घेण्यात आला. बैठकीस पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, जयंत पाटील उपस्थित होते. यावेळी तिन्ही पक्षांच्या पदाधिकार्यांची सक्षम उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय झाला.
महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवार निवडीकरिता सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली वेगावल्या आहेत. त्यासाठी आपल्या पक्षाला जादा जागा कशा मिळतील, यासाठी महायुतीमधील घटक पक्षांच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांची यासंदर्भात शुक्रवारी अधिकृत पहिली बैठक झाली. यामध्ये एकत्र लढण्याचा निर्णय घेऊन नेत्यांनी आपापल्या जागांचे प्रस्ताव दिल्याचे समजते.
उपसमितीची आज बैठक
सक्षम उमेदवारांच्या चाचपणीसाठी उपसमिती स्थापन करण्यात आली. या समितीमध्ये भाजपचे आमदार अमल महाडिक, युवासेना पश्चिम महाराष्ट्र प्रमुख ऋतुराज क्षीरसागर, जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, दक्षिण विधानसभा प्रमुख शारंगधर देशमुख, प्रा. जयंत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आदिल फरास, महेश सावंत, संदीप कवाळे यांचा समावेश आहे. या उपसमितीची शनिवारी (दि.20) बैठक होणार आहे.
जागांबाबत उपसमिती करणार प्राथमिक चर्चा
उपसमिती शहरातील सर्व प्रभागातील महायुतीच्या निवडून येण्याची क्षमता असणार्या उमेदवारांची चाचपणी करणार आहे. तसेच किती जागांवर कोणी लढायचे याची प्राथमिक चर्चाही समिती करणार आहे. त्याचा अहवाल उपसमिती पालकमंत्री आबिटकर, मंत्री मुश्रीफ, मंत्री पाटील, आमदार क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक या वरिष्ठ नेत्यांकडे सादर करणार आहे. यानंतर अंतिम जागा वाटपावर निर्णय घेण्यात येईल.
सकारात्मक चर्चा : आ. क्षीरसागर
महायुतीच्या जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा सुरू असून, या बैठकीत महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी एकसंध राहण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.

