मुंबई, पुढारी वृत्तसेवा ; नवरात्रीत अष्टमी आणि नवमी या शेवटच्या दोन दिवसात रात्री बारापर्यंत गरबा व दांडियास परवानगी देण्यात आली आहे. मात्र नवरात्रीत आणखी एक दिवस म्हणजेच सप्तमीला रात्री बारापर्यंत परवानगी देण्यात आली असून नवरात्रोत्सवाची रंगत शनिवारपासून सोमवापर्यंत वाढणार आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, वर्षातील १५ दिवसच खुल्या जागेत-मैदानांवर रात्री १२पर्यंत कार्यक्रम आयोजित करता येतात. हे दिवस ठरवण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे.
मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी यांनी यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीलाच परिपत्रक काढून वर्षातील १५पैकी १३ दिवस रात्री १२ पर्यंत कोणत्या कार्यक्रमांना परवानगी द्यावी, याचे वेळापत्रक जाहीर केले होते. मात्र नवरात्र उत्सवासाठी आणखी एक दिवस रात्री १२प र्यंत कार्यक्रम करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी होत असल्याने शनिवारीही परवानगी देण्यात आली आहे. नवरात्रोत्सव आणि गरबा हे वेगळ समीकरणच आहे. गरब्यासाठी तरूणाईपासून आबालवृद्धांनाही वेड असते. त्यातच शनिवार रविवार विकेंड असल्याने शेवटच्या दोन दिवसात गरबा रंगणार आहेत.