

Tiger Shroff firing case
मुंबई: अभिनेता टायगर श्रॉफच्या जुहू येथील घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा अभिनेता अक्षय कुमारनेही धसका घेतला आहे. या पार्श्वभूमीवर अक्षय कुमारच्या घरावरही सलमान खानच्या घराप्रमाणे बुलेटप्रूफ काचा लावण्याचे काम सुरू आहे.
सलमान खानच्या घरावर यापूर्वीही बुलेटप्रूफ काचा लावण्यात आल्या होत्या, त्या आता अपग्रेड करण्यात येत आहेत. अक्षय कुमारच्या घराचीही आरोपींनी रेकी केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अक्षय कुमारच्या घराबाहेरही पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी अमिताभ बच्चन, आमिर खान, अक्षय कुमार आणि सलमान खान यांच्या घरांची रेकी करण्यासाठी रिक्षाचालकांची मदत घेतली. आरोपींना, 'कमी सुरक्षा असलेल्या सेलिब्रिटींना लक्ष्य करावे,' असे निर्देश शूटर्सना मिळाले होते. "आम्हाला अभिनेत्यांची घरे पाहायची आहेत आणि फोटो काढायचे आहेत," असे सांगत रिक्षाचालकांच्या मदतीने मोठमोठ्या अभिनेत्यांच्या घरांचा पत्ता मिळवला. आरोपी रिक्षाचालकांच्या मदतीने वांद्रे परिसरात फिरले आणि या अभिनेत्यांच्या घरांची रेकी केली. त्यानंतर, तिथे असलेली सुरक्षा सहज भेदणे शक्य नसल्याने आरोपींनी त्याची माहिती अनिल पंडितला दिली. त्यासंदर्भातील काही फोटो आणि व्हिडिओही आरोपींनी अनिल पंडितला पाठवल्याची माहिती समोर आली आहे.
यानंतर आरोपींनी आपला मोर्चा टायगर श्रॉफकडे वळवला, ज्यामुळे तो दर शनिवारी आणि रविवारी फुटबॉल खेळायला जातो, हे त्यांना समजले. त्यानंतर आरोपी ११ ऑक्टोबरला जुहूच्या मैदानावर गेले, मात्र टायगर तिथे न आल्याने ते १८ ऑक्टोबरला पुन्हा शस्त्रांसह पोहोचले. याच कालावधीत हरियाणातील आणखी काही जण मुंबईत येऊन रेकी करून परत गेले. गोळीबारासाठी एक विदेशी आणि एक देशी पिस्तूल वापरल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.
राजस्थानमधील कोटा येथून ताब्यात घेतलेल्या तिन्ही आरोपींना आज मुंबईतील न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, हल्ल्यापूर्वी आरोपींनी रेकी केल्याचे सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल रेकॉर्ड्सवरून समोर आले आहे. हल्ल्यामागील कथित सूत्रधार आणि शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्यांचा शोध गुन्हे शाखेकडून घेतला जात आहे.