विधान परिषदेच्या दोन जागा अजित पवार गटाला मिळणार

विधान परिषदेच्या दोन जागा अजित पवार गटाला मिळणार
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : विधान परिषदेच्या १२ जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान सदस्य बाबा जानी दुर्राणी यांना पुन्हा संधी दिली जाणार असून दुसऱ्या जागेसाठी मुंबईतील दलित चळ- वळीचा प्रगत चेहरा असलेले मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे समजते. संख्याबळानुसार अजित पवार गटाला परिषदेच्या दोन जागा निश्ति मिळणार असल्याचे गणितही या गटाने मांडले आहे.

विद्यमान विधानपरिषद सदस्य मनिषा कायंदे, विजय (भाई) गिरकर, अब्दुल्ल दुर्राणी, नीलय नाईक, अनिल परब, रमेश पाटील, रामराव पाटील, डॉ. वजाह मिर्जा, प्रज्ञा सातव, महादेव जानकर आणि शेकापचे जयंत पाटील हे ११ सदस्य २७ जुलै रोजी निवृत्त होत असल्याने १२ जुलै रोजी ही निवडणुक होत आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत २ जुलै आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्न न झाल्यास ही निवडणूक चुरशीची होऊ शकते.

विधानसभेतील संख्याबळानुसार विधानपरिषद निवडणुकीत मविआ ३ आणि महायुतीला ८ जागा जिंकण्याची संधी आहे. विधानसभेतील काही आमदारांनी राजीनामे दिल्याने आणि काहींचे निधन झाल्याने १४ जागा रिक्त आहेत. त्यामुळे या निवडणुकीत विजयासाठी २६ आमदारांची पहिल्या पसंतीची मते मिळवणे आवश्यक असेल. महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे ४२ आमदार आहेत. त्यानुसार या गटाला विधान परिषदेसाठी २ जागा मिळणार आहेत.

या दोन जागांसाठी तीन नावे चर्चेत आहेत. त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदे शाध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे नाव आघाडीवर होते. पण सध्या त्या राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आहेत. पराभूत झाल्यानंतरही सुनेत्रा अजित पवार यांना राज्यसभेचे सदस्य केल्यामुळे पक्षात आधीच नाराजी आहे. चाकणकर यांना आणखी विधान परिषदेची संधी दिल्यास या नाराजीमध्ये आणखी भर पडेल. म्हणून चाकणकर यांचे नाव मागे पडले.

लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नाराज असलेल्या मुस्लिम समाजाने भाजपच्या मित्र पक्षांच्या उमेदवारांना मते दिली नाहीत. ही नाराजी दूर करण्यासाठी अजित पवार यांनी बाबा जानी दुर्रानी यांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. अजित पवार गटाकडे मते खेचणारा दलित चेहरा नाही. हा वर्ग जवळ करण्यासाठी सिद्धार्थ कांबळे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्याचा विचार अजित पवार गट करत असल्याचे समजते. कांबळे हे अजित पवार यांचे खंदे समर्थक आहेत. मुंबईतील सहकारी संस्थांची शिखर संस्था असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे त्यांनी यापूर्वी अध्यक्षपद भूषविले. सध्या ते या बँकेचे उपाध्यक्ष असून अनेक सहकारी संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह अनेक ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी कांबळे यांच्या नावाला पसंती दिली असल्याचे बोलले जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news