

मुंबई : बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे विजयी झाल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभा मतदारसंघ बदलणार असल्याच्या वावड्यांना बुधवारी पूर्णविराम मिळाला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी बारामती विधानसभा मतदारसंघासाठी अजित पवार यांच्या नावाची घोषणा केली. सोबतच राष्ट्रवादीने 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून, त्यात नऊ मंत्र्यांसह 32 विद्यमान आमदारांचा समावेश आहे. (Maharashtra Assembly Polls | Ajit Pawar)
विशेष म्हणजे, जाहीर केलेल्या या यादीत सहा नवीन चेहरे आहेत. उर्वरित उमेदवारांची यादी गुरुवारी (24 ऑक्टोबरला) जाहीर करण्यात येईल, अशी माहिती तटकरे यांनी दिली. काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या आमदार सुलभा खोडके, हिरामण खोसकर तसेच भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीत चार महिलांचाही समावेश आहे.
अजित पवार गटाच्या 38 उमेदवारांच्या पहिल्या यादीत माजी कॅबिनेट मंत्री नवाब मलिक, नाशिक जिल्ह्यातील निफाड मतदारसंघाचे आमदार दिलीप बनकर आणि पुण्यातील आमदार सुनील टिंगरे यांच्या नावाचा समावेश नाही. त्यामुळे या तिघांचा पत्ता कट झाला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यातील मलिक यांना भाजपचा विरोध असून, पुण्यातील ‘हिट अँड रन’ प्रकरणात टिंगरे यांचे नाव समोर आल्यावर महायुतीला विरोधकांच्या टीकेस तोंड द्यावे लागले होते.