

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूकीसाठी मंगळवारी पहिल्या दिवशीच अर्ज नेण्यासाठी गर्दी झाली. काही ठिकाणी प्रमुख नेत्यांसाठी कार्यकर्त्यांनी अर्ज नेले. माढा व करमाळा मतदारसंघांसाठी नेहमीप्रमाणेच आ. बबनराव शिंदे व संजयमामा शिंदे यांच्याशी नामसाधर्म्य असलेल्या व्यक्तींनीही अर्ज नेले आहेत.
पुढारी वृत्तसेवा
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाकरिता नामनिर्देशन पत्र विक्रीच्या पहिल्या दिवशी १२ जणांनी १६ अर्ज नेल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विनायक मगर यांनी दिली. यामध्ये नामनिर्देशन पत्र घेण्यासाठी तहसील कार्यालयासमोर गर्दी झाली होती.
वंचित बहुजन आघाडी, देश जनहित पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, आरपीआय आठवले गट, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, एआयएमआयएम यासह अपक्ष उमेदवारांसाठी अर्ज नेण्यात आले. अर्ज घेणाऱ्यांमध्ये रासपाचे सुनील बंडगर, दत्तात्रय माडकर यांच्यासह विश्वनाथ शरणाप्पा हडलगी यांनी स्वतःसाठी अपक्ष म्हणून चार अर्ज नेले. एमआयएमचे मौलाली पठाण यांनी दोन अर्ज खरेदी केले आहेत.
बार्शी विधान सभा निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी १४ लोकांनी २२ अर्ज खरेदी केले असून एक अर्ज दाखल झाला आहे. बार्शी तहसील कार्यालयात विधानसभा उमेदवारासाठी अर्ज विक्री मंगळवारपासून सुरू झाली आहे. आज पहिल्या दिवशी अर्ज खरेदी करण्यासाठी तहसील परिसरात मोठी गर्दी झाली होती.
राजकीय पक्षांकडून ही कार्यकर्ते तहसील परिसरात उपस्थित होते. दिवसभरात विनोद जाधव, विकास जाधव, रवी शंकर गोदने, आनंद काशीद, मधुकर काळे (कोरेगाव), किशोर गाडेकर (श्रीपत पिंपरी), वर्षा कांबळे (गौडगाव), मोशिन तांबोळी, किशोर देशमुख (वैराग), हर्षद मुठाल (खामगाव), अरबाज पठाण (बार्शी), आनंद यादव (बार्शी) यांनी अर्ज खरेदी केले.
दक्षिण सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी एकूण २७ अर्ज नेण्यात आले. आ. सुभाष देशमुख, माजी आमदार दिलीप माने, पृथ्वीराज माने, संगमेश्वर काडादी, अप्पासाहेब पाटील, बाबा मिस्त्री, तौफिक शेख, सोमनाथ वैद्य यांच्यासाठी त्यांच्या प्रतिनिधींनी अर्ज नेले आहेत.
उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुजित शिंदे, तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून किरण जमदाडे काम पाहत आहेत. या मतदारसंघात मोठ्याप्रमाणत इच्छुकांची गर्दी आहे. त्याअनुषंगाने पहिल्या दिवशी विविध प्रमुख नेत्यांसाठी अर्ज नेण्यात आले. अर्ज नेतानाही काहींनी मोठ्या कार्यकर्त्यांच्या लवाजम्यासह दाखल झाले होते.
पुढारी वृत्तसेवा: माढा विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. एकूण तीस अर्जाची विक्री झाली. यामध्ये विद्यमान आ. बबनराव शिंदे व त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांच्यासाठी नेलेल्या अर्जाचा समावेश आहे. त्यांच्यासाठी संतोष मराठे यांनी अपक्ष व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासाठी अर्ज नेले आहेत.
बहुजन समाज पार्टीसाठी नितीन महादेव गायकवाड यांनी तर शिवाजी कांबळे यांच्यासाठी अपक्ष म्हणून उमेश शिंदे यांनी अर्ज नेला. आ. बबनराव शिंदे व संजयमामा शिंदे यांच्याशी नामसाधर्म्य असलेल्या व्यक्तींनीही अर्ज नेले आहेत
पुढारी वृत्तसेवा : करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवार पहिल्या दिवशी दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून ५४ अर्जाची विक्री झाली आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मरोड यांनी दिली. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार शिल्पा ठोकडे उपस्थित होत्या.
करमाळा विधानसभा निवडणुकीसाठी तहसील कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज विक्री व दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. अशोक ज्ञानदेव वाघमोडे (रा. निलज, ता. करमाळा) यांनी न्यू रासप या पक्षाकडून अर्ज दाखल केला, तर बाळासाहेब मछिंद्र बळेकर (रा. निंभोरे, ता. करमाळा) यांनी अपक्ष अर्ज दाखल केला.