

Rohit Pawar
मुंबई : गेले काही दिवस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धमकी प्रकरण सोशल मीडियातून व्हायरल झाल्याने ते पुन्हा वादात सापडले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील माढ्याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही. एस. यांना केलेला फोनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला अन् राज्यात अजित पवार यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांची पाठराखण केली आहे.
"कुर्डुवाडी प्रकरणात महिला आयपीएस अधिकारी यांनी घेतलेली भूमिका योग्यच होती पण त्याठिकाणी झालेला घोळ अजितदादांच्या हिंदीमुळे आणि बोलण्याच्या शैलीमुळे झाला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. याबद्दल स्वतः अजितदादांनी दिलगिरी व्यक्त केली. पण तरीही जाणूनबुजून काही प्रामाणिक पण सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे करून मीडिया ट्रायल केली जात आहे हे मात्र नक्की! मित्रपक्षांच्या नेत्यांची विनाकारण मीडिया ट्रायल करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांची, युवांच्या प्रश्नांची, महिला सुरक्षेच्या विषयाची, पुरावे दिलेल्या भ्रष्टाचार प्रकरणांची मीडिया ट्रायल करून राज्याच्या नेतृत्वाने कार्यवाही केली तर अधिक योग्य राहील," असे रोहित पवार म्हणाले.
सोशल मीडियावर केलेल्या या पोस्टमधून रोहित पवार यांनी नाव न घेता अजित पवारांच्या गटातील ज्येष्ठ नेत्यांवर निशाणा साधला. "राजकीय स्कोअर सेट करण्यासाठी आपल्या नेत्याची विनाकारण मीडिया ट्रायल घेतली जात असताना पक्षाच्या दोन तीन नंबरच्या जेष्ठ नेत्यांनी मात्र कुरघोड्या करणाऱ्या मित्रपक्षाला प्रो भूमिका घेऊन आपल्याच पक्षात स्वहितासाठी अंतर्गत कुरघोड्या करणे कितपत योग्य आहे? असो पक्षात "चहापेक्षा किटली गरम असणारे" एक दोन सहकारी असले की आमदार सोबत असूनही सर्वकाही आलबेल असतेच असे नाही, याचा अनुभव पक्ष नेतृत्वाला यानिमित्ताने आलाच असेल," असेही ते म्हणाले.