

नवी मुंबई: ऐरोली परिसरातील सेक्टर २० मध्ये असलेल्या शिव प्रसाद सोसायटीच्या कंपाऊंडचा एक भाग आज अचानक खचल्याने मोठी खळबळ उडाली. या घटनेमुळे इमारतीखालून जाणारी महानगर गॅसची पाईपलाईन फुटली आणि परिसरात वायूगळती सुरू झाली. सुदैवाने, नवी मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, ऐरोली सेक्टर २० मधील शिव प्रसाद सोसायटीच्या कंपाऊंडचा काही भाग अचानक खचला. जमिनीचा भाग खचल्याने त्याखालून गेलेली महानगर गॅसची मुख्य वाहिनी (फाईट) तुटली. यामुळे परिसरात वेगाने गॅस पसरू लागला आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. रहिवाशांनी तात्काळ या घटनेची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाला आणि अग्निशमन दलाला दिली.
घटनेची माहिती मिळताच, नवी मुंबई अग्निशमन दलाचे एक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी सर्वप्रथम परिसराची पाहणी करून गॅस गळतीचे नेमके ठिकाण शोधले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने महानगर गॅसच्या मुख्य कंट्रोल वॉलपर्यंत पोहोचून तो बंद केला. त्यामुळे गॅस पुरवठा खंडित झाला आणि पुढील धोका टळला.
अग्निशमन दलाच्या या प्रसंगावधानामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झालेले नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या घटनास्थळी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून, कंपाऊंडचा भाग का खचला याचा तपास संबंधित विभागाकडून केला जाण्याची शक्यता आहे. पावसामुळे जमीन भुसभुशीत झाली होती की बांधकामात काही त्रुटी होत्या, हे तपासानंतरच स्पष्ट होईल.