

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत एमआयएमच्या निवडून आलेल्या 8 नगरसेवकांपैकी सात नगरसेवक मुस्लिम, तर एक नगरसेवक हिंदू आहे.विशेष म्हणजे मराठी आहे. त्यामुळे एमआयएमचे नेतृत्व मुस्लिम नगरसेवकाकडे जाईल, असे वाटत होते. पण पक्षाने मराठी नगरसेवकाला गटनेता बनवून महापालिकेतील पक्षाची जबाबदारी सोपवत सर्वच राजकीय पक्षांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
एमआयएमने मुंबई महापालिकेत आपल्या स्वतंत्र गटाची नोंदणी केली आहे. ही नोंदणी करताना गटनेता म्हणून विजय उबाळे या मराठी नगरसेवकावर जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे मुस्लिम पक्ष म्हणून हिणवलेल्या राजकीय पक्षांनाही काही प्रमाणात चपराक बसली आहे. विजय उबाळे गटनेते बनल्यामुळे त्यांना स्थायी समितीचे सदस्य पद मिळणार हे निश्चित आहे. सभागृह व अन्य समित्यांपेक्षा गटनेत्यांच्या बैठकीला महत्त्व असते.
सभागृहात एखाद्या विषयावर चर्चा करायची असेल, अथवा काही धोरणात्मक निर्णयावर चर्चा करायची असेल तर पहिल्यांदा महापौरांच्या अध्यक्षतेखाली गटनेत्यांची बैठक संपन्न होते. या बैठकीत सर्वपक्षीय गटनेतेच नाही तर आयुक्त यांच्यासह अतिरिक्त आयुक्त व वरिष्ठ अधिकारीही असतात. त्यामुळे या बैठकीत एमआयएमला स्वतःचे मत व्यक्त करता येणार आहे.
एमआयएमचे नगरसेवक
विजय उबाळे, गटनेता
जमीर कुरेशी
रोशन इरफान शेख
पटेल शमीर रमझान
शबाना आतिफ शेख
शबाना मोहम्मद फारुख काझी
खैरीनुसा अकबर हुसेन
मेहजाबीन अधिक अहमद खान