AI Agriculture : कृषी क्षेत्रात आता एआय क्रांती

‘महाग्री-एआय’ धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी; 500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार
AI Agriculture
कृषी क्षेत्रात ‘एआय’ वापरासाठी धोरण आखण्यात येणार आहे
Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला डिजिटल युगात अग्रेसर ठेवणार्‍या ‘महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता महाग्री-एआय धोरण 2025-2029’ ला मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या धोरणामुळे कृषीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता (जेनरेटिव्ह एआय), इंटरनेट ऑफ थिंग्ज, ड्रोन, संगणकीय द़ृष्टिक्षमता, रोबोटिक्स आणि पूर्वानुमान विश्लेषण यासारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या मदतीने शाश्वत व विस्तारयोग्य उपाययोजना राबविता येणार आहेत. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पहिल्या तीन वर्षांसाठी 500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

‘महाग्री-एआय’ धोरणाच्या अंमलबजावणीसाठी त्रिस्तरीय प्रशासकीय संरचना असून, पुढील पाच वर्षांत या धोरणामध्ये आवश्यक ते बदल करण्यात येणार असून राज्यातील ग्रीस्टॅक, महा-ग्रीस्टेक, महावेध, क्रॉपसॅप, गमार्कनेट, डिजिटल शेतीशाळा, महा-डीबीटी यासारखे प्रकल्प पुढे नेण्यास मदत होणार आहे. त्यासाठी राज्यस्तरीय सुकाणू समिती, राज्यस्तरीय तांत्रिक समिती, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ग्रीटेक नावीन्यता केंद्र, कृषी विद्यापीठांतर्गत कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन व नावीन्यता केंद्र काम करतील. या धोरणाच्या माध्यमातून राज्यात कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता व नावीन्यतेसाठी एक अग्रगण्य केंद्र निर्माण होईल. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा शेतकरी-केंद्रित वापर, संशोधन, डेटा देवाण-घेवाण वाढेल, स्टार्टअप्सना पाठबळ मिळेल आणि यातून महाराष्ट्र डिजिटल कृषी नावीन्यतेमध्ये आघाडीवर राहील, अशी अपेक्षा आहे. या धोरणाद्वारे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा शेतकरी केंद्रित वापर करण्यास स्टार्टअप्स, खासगी तंत्रज्ञान कंपन्या, कृषी विद्यापीठे, संशोधन संस्था, कृषी विज्ञान केंद्रे, खासगी संस्था, शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक संस्था आदींना चालना मिळेल, असे उपक्रम हाती घेतले जाणार आहेत.

शेती संबंधित सर्व डेटाबेस जोडणार

आयआयटी - आयआयएस्सी सारख्या संस्थांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील चार कृषी विद्यापीठांमध्ये कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता नावीन्यता आणि इनक्युबेशन केंद्र स्थापण्यात येतील. डेटा आधारित शेती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरासाठी उपयोगी ठरतील अशा डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा उभारल्या जातील. क्लाऊड आधारित कृषी डेटा एक्स्चेंज आणि सँडबॉक्सिंग सुविधा उपलब्ध केली जाईल. या डिजिटल प्लॅटफॉर्मशी केंद्र व राज्य शासनाचे शेती संबंधित सर्व डेटाबेस जोडण्यात येतील (उदा. ग्रीस्टॅक, महावेध, महा-ग्रीटेक, क्रॉपसॅप, गमार्कनेट, डिजिटल शेतीशाळा, महा-डीबीटी इ.) या एक्स्चेंजद्वारे शेतकरी, त्यांची जमीन, पीक माहिती, स्थानिक हवामान, मृदा आरोग्य, इ. डेटा कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्पांसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

1. शेतापासून ग्राहकापर्यंत जिओ टॅगिंग : अन्नसुरक्षा, पुरवठा साखळीतील पारदर्शकता, अन्न गुणवत्ता हमी आणि शेतमालाला जागतिक बाजारपेठ मिळावी यासाठी एआय, ब्लॉकचेन आणि क्यूआर-कोड तंत्रज्ञानावर आधारित राज्यव्यापी शोधक्षमता व गुणवत्ता प्रमाणीकरण प्लॅटफॉर्म उभारण्यात येईल.

2. या प्लॅटफॉर्मद्वारे शेतापासून ग्राहकापर्यंतच्या प्रवासात पिकांना दिलेली खते व औषधे, शेती पद्धती, कापणीपश्चात प्रक्रिया व गुणवत्ता प्रमाणपत्र इत्यादी बाबींचे डिजिटल आणि जिओ टॅग केलेली नोंदवही तयार करेल.

3. शेतकरी उत्पादक संस्था, निर्यातदार, पॅक हाऊसेस, गुणवत्ता प्रमाणपत्र देणार्‍या संस्था, लॉजिस्टिक्स व ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म यांना या प्रणालीशी जोडले जाईल.

4. कृषी विद्यापीठांमध्ये प्रशिक्षण

राज्य कृषी विद्यापीठे, तांत्रिक संस्था आणि संशोधन भागीदारांमध्ये व कृषि तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाईल.

5. कृषी विभागातील अधिकार्‍यांसाठी विशेष कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण टूलकिट तयार करण्यात येतील. शेतकरी आणि शेतकरी उत्पादक संस्थांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापराबाबत प्रत्यक्ष प्रशिक्षण, डिजिटल साधने आणि मदत कक्ष उपलब्ध करून दिले जातील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news