वाशी : आरोग्यास हानिकारक असलेल्या वातावरणात भेसळयुक्त सुकामेव्याचे वर्गीकरण करून पॅकिंग केले जात असल्याने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) एपीएमसीच्या मसाला मार्केटमधील एक गाळा सील केल्याची माहिती एफडीएचे सहाय्यक आयुक्त योगेश ढाणे यांनी दिली.
मसाला मार्केटमधील गाळा क्रमांक जी-7 मध्ये काजू, बदाम आणि मनुक्यांमध्ये भेसळ होत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. निकृष्ट दर्जाचा सुकामेवा आकर्षक दिसावा यासाठी काजू, बदाम, मनुके केमिकलमध्ये बुडवून रंगवले जात असल्याचे व्हिडीओत स्पष्ट दिसत होते. हा प्रकार आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असल्याने त्याची गंभीर दखल घेऊन अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकारी रश्मी वंजारी यांनी या दुकानावर छापा मारून हा भेसळयुक्त सुकामेवा जप्त केला. तसेच संबंधितांवर कारवाई करून सदर गाळा सील करण्यात आला आहे.