

मुंबई : राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी सेलने अखेर बीएएमएस (आयुर्वेद), बीएचएमएस (होमिओपॅथी) आणि बीयूएमएस (युनानी) या पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.
एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांची पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर इतर वैद्यकीय शाखांच्या प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. आता या अभ्यासक्रमांच्या पहिल्या आणि दुसऱ्या फेरीसाठी वेळापत्रक जाहीर झाले आहे.
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या वैद्यकीय समुपदेशन समितीने (एमसीसी) वैद्यकीय अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर सीईटी कक्ष) वैद्यकीय, दंत, आयुष व निमवैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी २३ ते ३० जुलैदरम्यान नोंदणी प्रक्रिया राबविली होती. मात्र एमसीसीकडून फक्त वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यानुसार वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाची पहिली फेरी पार पडल्यानंतर आता एमसीसीकडून आयुष अभ्यासक्रमांतर्गत असलेल्या बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस तर निमवैद्यकीय अभ्यासक्रम असलेल्या बीएनवायएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी व 'बीपी अॅण्ड ओ' या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळा-पत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार पूर्वी नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना नोंदणी करण्याची संधी मिळावी यासाठी १ ते ४ सप्टेंबरदरम्यान नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याच कालावधीत विद्यार्थ्यांना शुल्क व कागदपत्रे ऑनलाईन भरायचे आहेत. शुल्क भरलेलाच विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र ठरणार आहे.
दुसऱ्या फेरीसाठी जागांचा तपशील १ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. या फेरीसाठी विद्यार्थ्यांना २ ते ४ ऑक्टोबरदरम्यान पसंतीक्रम भरता येणार आहे. ६ ऑक्टोबर रोजी दुसऱ्या फेरीसाठीची निवड यादी जाहीर होणार आहे. या फेरीमध्ये प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना ७ते ११ ऑक्टोबरदरम्यान प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. यामध्ये सर्वाधिक जागा बीएएमएस अभ्यासक्रमात असून, बीपीओमध्ये सर्वात कमी जागा उपलब्ध आहेत.
राज्यातील विविध शासकीय, अनुदानित व विना अनुदानित महाविद्यालयांमध्ये सर्वाधिक म्हणजे ९ हजार ७३१ जागा बीएएमएस (आयुर्वेद) या अभ्यासक्रमासाठी आहेत. त्यानंतर बीपीटीएच (फिजिओथेरपी) मध्ये ५ हजार १९५, तर बीएचएमएस (होमिओपॅथी) मध्ये ४ हजार ४१७ जागा उपलब्ध आहेत. युनानी पद्धतीच्या बीयूएमएसमध्ये ३८३ जागा आहेत. बीओटीएच मध्ये ९० जागा, तर बीएनवायएस (नॅचुरोपथी व योग) या अभ्यासक्रमात १८० जागा उपलब्ध आहेत. सर्वात कमी म्हणजे बीपीओ (प्रॉस्थेटिक्स अँड ऑर्थोटिक्स) मध्ये फक्त ८ जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.