

Aditya Thackeray Shiv Sena : महाराष्ट्राच्या राजकारणात आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये एक मोठी घडामोड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेना पक्षाच्या आगामी वर्धापन दिनी, म्हणजेच १९ जून रोजी, आमदार आदित्य ठाकरे यांची पक्षाच्या 'कार्याध्यक्ष' पदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. या नियुक्तीनंतर आदित्य ठाकरे आपली एक नवीन आणि तरुण फळीची टीम उभी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या संभाव्य निर्णयामुळे शिवसेनेच्या इतिहासातील २००३ च्या घटनेची पुनरावृत्ती होणार असल्याचे बोलले जात आहे. ३० जानेवारी २००३ रोजी महाबळेश्वर येथे झालेल्या अधिवेशनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्ष म्हणून घोषणा केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी स्वतःची टीम तयार करून पक्षाची धुरा सांभाळली होती. आता तशीच जबाबदारी आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर सोपवून उद्धव ठाकरे त्यांना 'फ्रंट फूट'वर आणण्याच्या तयारीत आहेत.
या सर्व चर्चांना शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी दुजोरा दिला आहे. माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, "पक्षाला नव्या रक्ताची गरज आहे. तरुणांना संधी दिली पाहिजे, हे काळाची गरज आहे. आदित्य ठाकरे हे सध्या पूर्ण ताकदीने महाराष्ट्र दौरा करत आहेत, त्यांना मिळालेला प्रतिसाद पाहता पक्षाच्या संघटनात्मक रचनेत बदल होणे स्वाभाविक आहे." राऊतांच्या या विधानामुळे आदित्य ठाकरेंच्या पदोन्नतीवर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे.
आदित्य ठाकरे हे सध्या वरळीचे आमदार असून युवासेनेचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. कार्याध्यक्ष पद मिळाल्यानंतर ते केवळ मुंबईच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली एक नवीन कोअर कमिटी (Team) स्थापन केली जाईल, ज्यामध्ये तरुणांना आणि नव्या चेहऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. उद्धव ठाकरे यांचे वय आणि प्रकृती पाहता, आदित्य ठाकरेंनी आता पक्षाचा कारभार अधिकृतपणे हाती घ्यावा, अशी मागणी अनेक ज्येष्ठ नेत्यांकडून आधीपासूनच होत होती.