

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारमध्ये अनेकांना परदेश दौरे करायला आवडते. तुम्हाला कुठे जायचे तिथे जा; पण जनतेच्या पैशांवर परदेशवारी नको, अशा शब्दांत ठाकरे गटाचे नेते, आ. आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीकेची तोफ डागली. सरकारच्या परदेश दौर्यावर टीका केली म्हणून मुख्यमंत्र्यांनी दौरा रद्द केला, असे सांगतानाच 'ये डर अच्छा है' असे म्हणत आदित्य यांनी टोला लगावला. तसेच पालिकेच्या रस्ते आणि स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याची लोकायुक्तांकडे तक्रार करणार असल्याचा इशाराही दिला.
अवकाळी पावसामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांचा दौरा रद्द केल्याचे कारण दिले जात आहे; पण अवकाळी पावसामुळे दौरा रद्द केलेला नाही, त्यांना शेतकर्यांचे काहीही पडलेले नाही, असा हल्लाबोल आदित्य यांनी केला. विधानसभेचे अध्यक्ष घानाला जाणार होते. इथे लोकशाहीची हत्या करताहेत आणि ते तिथे लोकशाहीवर जाऊन बोलणार होते, असे ते म्हणाले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या जपान दौर्यावरही त्यांनी आक्षेप घेतला.
ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे सामान्य जनतेला पाहता यावीत, यासाठी महाराष्ट्रास तीन वर्षांसाठी देण्यास व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमने मान्य केले आहे. ही वाघनखे शिवकालीन आहेत की, छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आहेत याचा सरकारने खुलासा करावा.