

Aditi Tatkare:राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे खाजगी सचिव राजेश गायकवाड यांच्याविरोधात गंभीर तक्रार दाखल करण्यात आली आहे. गायकवाड हे आपल्या पदाचा गैरवापर करून विभागातील अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचा आणि त्यांना 'ब्लॅकमेल' करत असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे मंत्रालयातील प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमका आरोप काय?
महिला व बालविकास विभागाच्या राजपत्रित अधिकारी संघटनेचे अध्यक्ष संतोष भोसले यांनी ही तक्रार केली आहे. गायकवाड हे शासकीय कामात हस्तक्षेप करून अधिकाऱ्यांना धमकावत असल्याचे भोसले यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्य सचिवांकडे धाव घेत लेखी तक्रार दाखल केली असून गायकवाड यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
राजेश गायकवाड यांचा खुलासा
दुसरीकडे, आपल्यावर झालेले सर्व आरोप राजेश गायकवाड यांनी फेटाळून लावले आहेत. "हे सर्व आरोप पूर्णपणे निराधार आणि वैयक्तिक आकसापोटी केलेले आहेत. शासकीय प्रक्रियेनुसारच सर्व कामे सुरू आहेत," असा खुलासा गायकवाड यांनी केला आहे.
या वादामुळे आता महिला व बालविकास विभागातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला असून, मुख्यमंत्री यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.