

मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कुडाळकर यांनी सार्वजनिक सुविधांसाठी राखीव असलेल्या म्हाडाच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचा तसेच सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. संबंधित आरोपांची सखोल चौकशी करण्याचे आणि गुन्हे दाखल करण्याचे आदेश भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत विशेष न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) दिले आहेत. न्यायालयाचा हा आदेश कुडाळकर यांच्यासाठी मोठा झटका मानला जात आहे.
मंगेश कुडाळकर यांच्यावर आरोप करीत स्थानिक रहिवासी रमेश सत्यान बोरवा यांनी तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची दखल घेत मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायाधीश सत्यनारायण आर. नावंदर यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
तक्रारदाराने कुर्ला (पूर्व) येथील सुविधा सेवा आणि उद्यानासाठी राखीव असलेल्या भूखंडावर कुडाळकर यांनी अनधिकृतपणे एक हॉल आणि अनेक व्यावसायिक केंद्रे बांधल्याचा आरोप केला आहे. या आरोपासंदर्भात तक्रारदाराने प्रतिज्ञापत्रासह पुरावे म्हणून अनेक कागदपत्रे सादर केली आहेत. त्या कागदपत्रांची तसेच म्हाडाने दिलेल्या पत्रव्यवहारासह सादर केलेल्या इतर साहित्याची तपासणी केल्यानंतर न्यायालयाने मंगेश कुडाळकर यांच्या सखोल चौकशीचा आणि गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.
न्यायालयाचे निरीक्षण
प्रथमदर्शनी म्हाडाने सुविधा सेवा आणि उद्यानासाठी राखीव ठेवलेल्या भूखंडावर काही व्यावसायिक केंद्रांसह अनधिकृतपणे हॉल बांधला गेल्याचे उघड होत आहे, असे निरीक्षण विशेष न्यायाधीशांनी चौकशीचा आदेश देताना नोंदवले आहे. तक्रारदाराने केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे. त्या आधारे पोलिसांनी सखोल चौकशी करण्याइतपत पुरावे निदर्शनास येत असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.