

जोगेश्वरी : गोरेगाव आरे कॉलनीच्या जंगलात एका काळोख्या रात्री कॅन्सरग्रस्त आजीला नातवाने निर्जनस्थळी सोडून दिल्याची घटना घडली होती. पोलिसांनी आजीला रुग्णालयात दाखल करीत तिचा जीव वाचवला होता. या आजीने अखेर आश्रमातच अखेरचा श्वास सोडला. यशोदा गायकवाड (वय 68) असे आजीचे नाव असून तिच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.
नातवाने ऐवढी वाईट वागणूक दिली असताना या आजीने जगाचा निरोप घेतानाही नातवाला चांगले आशीर्वाद दिल्याचे बोलले जात आहे. यामुळे या कृतघ्न नातवाविरोधात आताही सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
23 जून 2025 रोजी आरेच्या जंगलात कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ यशोदा गायकवाड सापडल्या होत्या. स्थानिकांनी पोलिसांना कळवल्यानंतर त्यांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासात नातू सागर शेवाळे याला आजीच्या उपचाराचा खर्च परवड नव्हता. यामुळे त्याने आजीला आरेच्या जंगलात सोडले होते. उपचारानंतर आजीला उत्तनमधील आश्रमात दाखल करण्यात आले होते.
यशोदा यांना त्वचेचा कर्करोग (स्किन कॅन्सर) होता. त्या कांदिवलीतील पोईसर परिसरात त्यांच्या नातू सागर शेवाळे याच्यासोबत राहत होत्या. त्यांच्या मालकीची एक भाडेकरू दुकान आहे. ज्यामुळे त्यांचा उपचार खर्च (महिन्याला 10 ते 15 हजार रुपये) भागवता येत होता.